बीड लोकसभेच्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा निवडणुकीत पराभव झाला तर मी जीव देईन, अशी धमकी एका कार्यकर्त्याने दिली होती. या धमकीचा व्हिडीओ सदर व्यक्तीने प्रसारित केला होता. या व्यक्तीचा बस अपघातात शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. पोलिसांनी ही आत्महत्या असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.

शुक्रवारी रात्री अहमदपूर-अंधोरी रस्त्यालगत असेलल्या बोरगाव पाटी येथे झालेल्या अपघातात ३८ वर्षीय सचिन कोंडिबा मुंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृत व्यक्ती लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील येस्तर या गावचा रहिवासी होता.

पोलिसांनी सांगितले की, ज्या बसमुळे अपघात झाला त्याच्या चालकाला अटक करण्यात आले आहे. मुंडेंचा मृत्यू अपघातामुळे झाला की ही आत्महत्या होती, याचा तपास सुरू आहे. येलदरवाडी येथे रात्री मुक्कामी आलेली बस बोरगाव पाटी येथे थांबली होती. बस रिव्हर्स घेत असताना मागे उभा असलेला सचिन बसखाली चिरडला गेला.

किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब खंदारे या अपघाताची चौकशी करत आहेत. यासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाची सदर बस तपासासाठी जप्त करण्यात आली आहे. मृत सचिन मुंडे हा अविवाहित असून तो आपल्या पालकांबरोबर राहत होता. त्याल एक भाऊही आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रसारित केला होता. ज्यात तो म्हटला की, पंकजा मुंडेंचा पराभव झाला तर मी जिवंत राहणार नाही. हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.

सचिन मुंडेंच्या कुटुंबियांनी सांगितले की, निकाल लागल्यापासून सचिन तणावात होता. ५ जून पासून त्याने अबोला धरला होता. शनिवारी सकाळी सचिन मुंडेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंकडून पराभूत

लोकसभा निवडणुकीला पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडे यांना पराभव सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी त्यांचा ६,५५३ मतांनी पराभव केला. बीडची लढत अतिशय चुरशीची झाली होती. रात्री उशीरापर्यंत याठिकाणी मतमोजणी सुरू होती. ५ जून रोजी रात्री उशीरा निवडणूक आयोगाकडून बीडचा निकाल जाहीर करण्यात आला होता.