Ashadhi Ekadashi 2022: : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना महापुजेचा मान मिळाला. मुरली नवले हे गेल्या अनेक वर्षांपासून पायी वारी करत आहेत.

खरंतर, विठ्ठलाकडे अनेकजण धन, दौलत, जमीन-जुमला आणि दीर्घ आयुष्य मागतात. पण मानाचा वारकरी ठरलेल्या जिजाबाई यांनी विठुमाऊलीकडे काय मागितलं? असं विचारलं असता, त्यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल. याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “माझे पाय चांगले राहू दे! अशी मागणी केली. म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा वारीला येता येईल.”

हेही वाचा- पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली आषाढी एकादशीची महापूजा; पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फोटो

त्यांचे पती मुरली बबन नवले हे गेल्या ३०-३५ वर्षांपासून म्हणजेच लग्नाआधीपासून वारी करत आहेत. पण जिजाबाई यांचं हे वारीचं दुसरंच वर्ष आहे. त्यांचे पती मागील १२ वर्षांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून मुरली नवले हे १९८७ पासून न चुकता वारीला येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापुजेनंतर म्हटलं की, “आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्ठकरी, कामकार, शेतमजूर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष सुखाचं, आनंदाच आणि समृद्धीचं जावो,” अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी पांडूरंग चरणी केली आहे.