नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यवतमाळमध्ये सभा घेण्याचा शिरस्ता कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तेथे महिला मेळाव्याला संबोधित केले. या सभेच्या मंडप उभारणीचा खर्च आणि गर्दी जमवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यामुळे ही सभा अधिक चर्चेत आली आहे. सभेच्या मंडपाकरिता पावणेतेरा कोटी रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता विशेष बाब म्हणून अवघ्या आठ दिवसांत या कामाला मान्यता देण्यात आली.

हेही वाचा >>> आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!

ग्रामविकास विभागांअतर्गत महिला बचत गटांचा मेळावा बुधवारी यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी उमेद आणि माविमच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावातून महिलांना आणण्यात आले होते. मेळाव्यासाठी यवतमाळ शहरालगत डोरली परिसरात २७ एकर जमिनीवर मंडप उभारण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मंडपाचे काम तीन विविध कंत्राटदारांना दिले व त्यासाठी १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा खर्च करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील दायमा, नागपूर येथील उइके तर अकोला येथील उजवणे या तीन कंत्राटदारांनी हा भव्य मंडप उभारला होता. राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे स्वत: या कामावर देखरेख ठेवून होते, हे विशेष.

राज्यातील तीन वेगवेगळ्या एजन्सींना मंडप उभारणीचे काम देण्यात आले होते. या कामात मंडपासह मंडपातील अनुषंगिक कामांचा समावेश होता. हे काम १२ कोटी ७३ लाख ३३ हजार ५०० रुपयांना देण्यात आले. आठ दिवसांत काम पूर्ण करणे आवश्यक असल्याने विशेष बाब म्हणून निविदा प्रक्रियेशिवाय कामांचे वाटप करण्यात आले.

दादासाहेब मुकडेकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.