Manikrao Kokate Remark on Playing Rummy in Assembly Session : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या बाकावर बसून मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून कोकाटेंवर टीका होत असताना, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना कोकाटे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळताच येत नाही. तरी देखील याप्रकरणी चौकशी करावी. मी दोषी आढळलो आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात यासंबंधी निवेदन दिलं तर मी थेट राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा सादर करेन.”
मला मोबाइलवरी गेम स्किप करता आला नाही : कोकाटे
कृषीमंत्री कोकाटे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असले तरी व्हिडीओमध्ये ते फोनवर पत्त्यांचा एक गेम खेळत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. यावरून कोकाटे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “तो रमीचा डाव नाही. त्या दिवशी सभागृहात माझं काम होतं. संध्याकाळी सहा वाजता माझी लक्षवेधी होती. अशा वेळी सहाय्यकाकडून काही माहिती मागवायची असल्यास त्यांना फोन करावा लागतो, कधी एसएमएस करावा लागतो. मध्येच कोणाला बोलावता येत नाही. त्यासाठी मो मोबाईल सुरू केला. मात्र मोबाइलवर गेम आला जो मला स्किप करता आला नाही. नवीन फोनवर गेम स्किप करता आला नाही.”
“संपूर्ण व्हिडीओ तुमच्यासमोर आलाच नाही”
माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी मोबाइलवर रमी खेळत नव्हतो. पॉप अप झालेला गेम मला स्किप करता आला नाही. काही सेकंद माझ्या फोनच्या स्क्रीनवर तो गेम दिसला आणि तेवढाच व्हिडीओ तुमच्यासमोर आला. संपूर्ण व्हिडीओ तुम्हा माध्यमांसमोर आला नाही किंवा तुम्ही तो दाखवला नाही. परंतु, नवीन फोन घेतल्यावर असे गेम फोनवर पॉप अप होतात. मोबाइलमध्ये कुठलाही गेम पॉप अप झाल्यावर ३० सेकंद तो स्किप करता येत नाही. काही सेकंद तो गेम माझ्या फोनवर होता. त्याचदरम्यान १८ सेकंदांचा व्हिडीओ तुमच्यासमोर आला. कोणीतरी त्याचं चित्रण केलं आणि व्हिडओ व्हायरल केला.”
माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांकडे तकार करणार
कृषीमंत्री म्हणाले, “अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल करून माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, ज्यांनी ते चित्रण केलं त्यांनी पूर्ण व्हिडीओ का दाखवला नाही. ही गोष्ट प्रसारमाध्यमांच्या देखील लक्षात का आली नाही? त्या व्हिडीओत काही तथ्य नाही. म्हणूनच मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींना यासंदर्भात पत्र पाठवणार आहे. त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चोकशी करण्याची मागणी करणार आहे.”