मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. तसेच निर्णय न झाल्यास आज (१ नोव्हेंबर) रात्रीपासून जलत्याग करणार असल्याचाही इशारा दिला. यावर बोलताना मनोज जरांगे यांच्या मुलीने आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर राजकीय नेत्यांना त्यांच्या घरात घुसून मारेल,” असा इशारा जरांगेंच्या मुलीने दिला. ती टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होती.

मनोज जरांगेंची मुलगी म्हणाली, “शाहू महाराजांनी सांगितलं की, त्यांनी वडिलांना पाणी पाजलं आहे. ते यापुढे पाणी पितील. आम्ही आमची काळजी घ्यावी. त्यांची काळजी करणं सोडावं. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास ते पुन्हा जलत्याग करणार आहेत. हे या सरकारला कळायला नको का?”

“निर्णय न घेता केवळ तब्येतीची काळजी घ्या सांगतात”

“मागच्यावेळीही १७ दिवस उपोषण केलं. तसेच ४० दिवसात आरक्षण देऊ असं सांगितलं आणि विश्वासघात केला. आता पुन्हा वडील उपोषणाला बसले, तेव्हा निर्णय न घेता केवळ तब्येतीची काळजी घ्या सांगत आहे. याऐवजी सरकारने सरसकट मराठा आरक्षणाचा जीआर काढावा,” अशी मागणी जरांगेंच्या मुलीने केली.

हेही वाचा : “…तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार”; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर राजकीय नेत्यांना घरात घुसून मारेल”

“सरकार वंशावळीची जीआर काढतं, कुठं नोंदी असलेला जीआर काढतं. सरकार हे दोन जीआर काढत आहे, मग मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर सरकार का काढत नाही? आता माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर एक मुलगी म्हणून सांगते की, मी स्वतः या राजकीय नेत्यांना घरात घुसून मारेन,” असा इशारा जरांगेंच्या मुलीने दिला.