गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मागील अकरा दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात उपोषण करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खराब होत असल्याने कुटुबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित आरोपांवर मनोज जरांगे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

“अशाप्रकारे आरोप करणं हा राजकारण्यांचा धंदाच आहे. कुणी काही चांगलं काम पोटतिडकीने करायला लागलं की काहीतरी सांगून त्याला खुटी मारलीच (अडथळा निर्माण करणे) समजा, अशी राजकारण्यांची सवय असते. आम्ही पाठिमागे दोन वर्षांपूर्वीही आंदोलन केलं होतं. तेव्हा कुणाचं पाठबळ होतं? आताही आंदोलन केलं. मागील २० वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय,” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- “मनोज जरांगेंच्या जीवाला…”, घोषणा देत जालन्यात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “१२३ गावांच्या सर्वसामान्य पोरांनी हे आंदोलन आपल्या हातात घेतलं आहे. आम्ही आमची चटणी-भाकरी खातो आणि आम्हीच आमचा खर्च करतो. स्वत:च्या पैशातून मंडप आणतो. याच्यात कोणत्याही नेत्याचा काहीही संबंध नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय, असं म्हणण्याची कोणत्या नेत्यामध्ये हिंमत नाही.”

हेही वाचा- “मी मेलो तरी…”; मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, मित्राने सांगितला भयावह घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपली चळवळ आपल्यालाच लढावी लागेल, तरच आपल्याला न्याय मिळेल, अशी आमची भावना आहे. यासाठी १२३ गावं आम्ही एकत्र आलो आहोत. त्यातून हा लढा उभा राहिला आहे. १२३ गावांची लोकसंख्या तुम्ही कमी समजता का? हे सर्व राजकीय पाठबळाने करता येत नाही. राजकीय नेते काहीही बोलतात”, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.