Manoj Jarange in Mumbai: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्याचा सरकारचा निर्णय रास्त ठरवल्यानंतर बुधवारी राज्य सरकारनेच ही परवानगी दिली. त्यानुसार आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जरांगेंनी हे मान्य करण्यास नकार दिला असून आता थेट देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी ते आंतरवली सराटीमध्ये गणेशपूजा करून निघाले. गुरुवारी सकाळी जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जमावाने स्वागत केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाच्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी कदर करायला पाहिजे”, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. “देवेंद्र फडणवीस मुंबईत कोणत्याच आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यापासून थांबवणार नाहीत आणि गरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. पण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे”, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सगळ्या महाराष्ट्रासमोर असं सिद्ध करायचं होतं की त्यांनी तर आंदोलनाला परवानगी दिली. पण यातून महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला आहे. ते न्यायालयाकडे बोट दाखवत होते. पण शेवटी परवानगी त्यांनीच दिली. त्यामुळे ते एक दिवसाचीही परवानगी देऊ शकतात आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंतही आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण त्यांनी जाणूनबुजून एकच दिवसाची परवानही दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला हवं होतं”, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

फडणवीसांचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलंय – जरांगे

“यांचं बहुमताचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलं आहे. तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली, तर येणारे दिवस तुमचं राजकीय करिअर बरबाद करणारे असतील. मी वारंवार सांगितलंय, आजही तेच सांगतोय.. देवेंद्र फडणवीसांना आता योग्य संधी आहे. संधीचं सोनं करा. मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही हा आमचा शब्द आहे”, असंही जरांगे पाटील म्हणाले.