Manoj jarange patil on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनंतर उपोषण सोडले आहे. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची मागणी आणि इतर काही मागण्या मान्य झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले. दरम्यान आंदोलन संपवल्याची घोषणा होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून काही शंकांची उत्तरं घेतली.
मराठा आंदोलकांच्या समोरच जरांगे यांनी विखे पाटील यांना आता हैद्राबादच्या गॅझेटीयरची अंमलबजावणी झाली का? असा थेट प्रश्न विचारला. त्याच्या अंमलबजावणीसाठीच तर जीआर काढला आहे असे उत्तर विखे पाटील यांनी दिले. यापुझे गॅझेटीयरमधील नोंदीनुसार आम्हाला आता कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार का? यावर विखे यांनी सांगितले की, जे आपण निकष दिले आहेत, ती पूर्तता केली की.. नातेवाईक असेल, कोणी पंजोबा-खापर पंजोबा असेल किंवा कुटुंबातील कोणी असेल आणि प्रतिज्ञापत्र दिलं तरी त्याला दाखला दिला जाईल असे विखे पाटील म्हणाले.
मला उद्या-परवा अभ्यासक येऊन जर म्हणाले की इथे फसवणूक झाली, तर मला विखे-पाटील यांच्याकडून एक शब्द पाहिजे की त्याचा सुधारित एक जीआर काढावा. यावर विखे पाटील म्हणाले की, “मी जरांगेंना एवढंच सांगू इच्छितो की, जीआरच्या माध्यमातून अतिशय विचारपूर्वक सर्व प्रक्रिया आपण पूर्ण केल्या आहेत. तरी त्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे माझ्याकडे पाठवा. आपण त्यात शुद्धीकरण करू,” असे आश्वासन विखे पाटील यांनी यावेळी दिले.
जर कदाचित चार-आठ दिवसांनी कोणी म्हणालं की यात चूक आहे, तर विखे पाटील साहेब मी तुमच्या घरातून जीव देईपर्यंत उठणार नाही. मराठा समाजाचं वाट्टोळं नको. माझं नशीब चांगलं आहे की, अशा मंत्र्यांनी जीआर काढला आहे की ते माझ्या टप्प्यातच आहेत. जरी फसवणूक झाली तर सांगतो, आपण हळूहळू ३ कोटी मराठे आरक्षणात घातले आहेत. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण आरक्षणात घातला आहे. माझा तुम्हाला शब्द आहे की जीवात जीव असेपर्यंत लढेन असेही मनोज जरांगे म्हणाले.