Manoj Jarange Patil Message for Maratha Protesters : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अनेक नेते आंदोलनस्थळाला भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, तिथून निघताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारला घेराव घातला. तसेच त्यांच्या कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व आंदोलकांना आवाहन केलं की इथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याला सन्मानाने वागवा.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगवेगळे नेते येतील. तो नेता कुठल्याही पक्षाचा असो, भाजपाचा असो, विरोधी पक्षाचा असला तरी त्याला आपल्या पोरांनी त्रास देऊ नये. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला शत्रू असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. अन्यथा नेथे इथे यायला घाबरतील. मला आत्ता पत्रकारांनी सांगितलं की काही लोकांनी मघाशी इथे गोंधळ घातला. हे बरं नाही.”
“आता सगळी जबाबदारी तुमच्यावर”, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे म्हणाले, अरे पोरांनो, नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घातला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. इथे कोणीही येऊ द्या, भाजपाचा नेता किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नेता, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर पक्षाचा नेता इथे आल्यावर त्याला सन्मानाने वागवा. आपल्याला सहन होतंय तोवर त्यांचा सन्मान करायचा. परंतु, जेव्हा आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाही तेव्हा बघू काय करायचं. परंतु, सध्या कुठल्याही पक्षाचा नेता इथे आला तरी उलट बोलू नका. आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे.”
गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवलं होतं का ते बघा : मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं. सरकार दंगल घडवू शकतं. कारण माझी पोरं असं काही करत नाहीत. गोंधळ घालणारे सरकारचेच लोक असू शकतात. त्यामुळेच ते असं वागले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध राहा. तुर्तास इथे येणाऱ्या कुठल्याही नेत्याला त्रास देऊ नका. बाकी मी सगळं बघतो. मी सगळ्यांना पुरून उरणारा आहे.”