मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील २० जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई पायी प्रवास करत कार्येकर्ते दाखल होणार आहेत. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. “मुंबईत येताना कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई करणार,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं. आता मराठा आंदोलक जरांगे-पाटलांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं, “आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि मंत्रीमंडळातील सहकारी प्रयत्नशील आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणाचेच दुमत नाही. पण, काहीजण टोकाचं बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत.”

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत अजित पवारांचं शरद पवारांवर टीकास्र; म्हणाले, “८४ वय झालं तरी…”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर करून आपण पुढं जात आहोत. पण, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई करणार. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही,” असं अजित पवार म्हणाले.

“करोडो मराठ्यांच्या वाटोळं केलं”

यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे-पाटलांनी म्हटलं, “शेवटी त्यांनी पोटातले ओठात आणलेच. पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं. दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांच्या वाटोळं केलं. शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील.”

हेही वाचा : “बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं”, अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर आम्ही त्याला सरकार मानत नाही”

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत? या प्रश्नावर जरांगे-पाटील म्हणाले, “अजित पवार अपघातानं सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल, तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच. तू कारवाई कर, तेव्हा मराठेही शांततेत उत्तर देतील.”