मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच्या लढ्यात सहकार्य करणारे किर्तनकार अजय बारसकर यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजय बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हे हेकेखोर वृत्तीचे असल्याचा आरोप केला. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी बंद दाराआड काही बैठका घेतल्या आहेत आणि अद्याप या बैठका होत असल्याचा आरोपही बारसकर यांनी केला आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी संत तुकाराम यांचा अवमान केला असल्याचा आरोप बारसकर यांनी केला. बारसकर यांच्या या आरोपांना आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, तो (अजय बारसकर) कुठल्या नेत्याबरोबर फिरत होता, कोणत्या नेत्याच्या मागे मागे पळत होता, याचे सगळे रेकॉर्डिंग्स आमच्याकडे आहेत. आता मराठ्यांना आरक्षण मिळत आहे, तर ही गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खुपतेय. जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल तोंडून जे शब्द निघाले त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतं. मी त्यानंतर आत्मक्लेश केला. माफी मागितली, मी त्याबद्दल आताही तोंडात मारून घेतो. चुकून काहीतरी निघून गेलं असेल. परंतु, त्यानंतरही बारसकर हे सगळं बोलणारच आहे. त्याला तेच काम देण्यात आलं आहे. त्याला आपल्यावर टीका करण्याचा ठेका दिला आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, अजय बारसकरसारखे प्रवचनकार असतील तर जनता कशी सुधारेल? त्याला माझ्या हातून पाणी प्यायचं होतं, त्याला भोंदू बाबा व्हायचं होतं. दुसऱ्या बाजूला कुठल्या तरी प्रवक्त्याला मंत्री व्हायचं आहे. बारसकर आणि तो प्रवक्ता मिळून बदनामीचा डाव रचत आहेत. मी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती करतो की तुम्ही आजपासून मला त्या बारसकरबद्दल काही प्रश्न विचारू नका. त्याला विनाकारण प्रसिद्धी दिली जात आहे. ज्याला समाजमाध्यमांवरही कोणी विचारत नाही, त्याला तुम्हा वृत्तवाहिन्यांच्या मुख्य कार्यालयांनी काही मिनिटात इतकं महत्त्व कसं काय दिलं? त्याची पत्रकार परिषद सर्व वृत्तवाहिन्यांनी लगेच लाईव्ह दाखवली (थेट प्रसारण केलं). याचा अर्थ त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे. यात सरकारचा मोठा ट्रॅप आहे.
हे ही वाचा >> महायुतीत लोकसभेच्या कमी जागा मिळाल्यास प्लॅन बी काय? ३२-१२-४ च्या फॉर्म्युल्यावर शिंदे गटाचे खासदार म्हणाले…
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी अजय बारसकरला एवढंच सांगेन की, मराठा समाजाला संपवायचा प्रयत्न करू नको. संत तुकारामांच्या आडून हल्ले करू नको आणि कोणाच्याही पोराबाळांपर्यंत जाऊ नको. तुलाही लेकरं आहेत हे लक्षात ठेव.