Manoj Jarange Patil vs Chitra Wagh & Devendra Fadnavis : चित्रा वाघ यांनी आरोप केला आहे की मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला आहे. यासह वाघ यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. मनोज जरांगे यांनी फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपाचे कार्यकर्ते करत आहेत. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आमच्या आया-बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तेव्हा हे लोक कुठे गेले होते? मी फडणवीसांना आईवरून काही बोललोच नाही. तरी देखील कोणी असा दावा करत असेल तर ते शब्द मी मोठ्या मनाने मागे घेतो.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “चित्रा वाघ म्हणतायत की मी शिवी दिली. परंतु, मी काही कोणाला शिवी दिलेली नाही. तरी त्यांना असं वाटत असेल तर ज्या शब्दांवर त्यांचा आक्षेप आहे ते मी मागे घेतो. परंतु, आम्हाला आरक्षण द्या. कारण आमच्या आया-बहिणी देखील दिवसरात्र राब राब राबतायत, कष्ट करतायत. त्यांची लेकरं गळफास घेत आहेत. तुम्ही तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईकडे पाहा आणि तिच्या लेकराला आरक्षण द्या.

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, “माझ्यावर आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांनी सांगावं की आमची आई पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तुम्ही कुठे होता? आमच्या आईचं दुःख तुम्हाला दिसलं नाही का? तेव्हा आमच्या आईला विसरलात का?”

“त्या बाईला (चित्रा वाघ) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आमची आई दिसली नाही का? ती बाई तेव्हा कुठे गेली होती? कधीपर्यंत सरकारच्या शाळा सांभाळणार? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू कुठे मेली होतीस? आमच्या लहान लहान मुली, तीन-चार वर्षांच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाहीतर तुझे सगळे घोटाळे बाहेर काढेन.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “चित्रा वाघ फडणवीसांसाठी बोलतायत. कदाचित त्यांना आमदार किंवा खासदार व्हायचं असेल. मला त्यांना सांगायचं आहे की अनेक लोक आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आईकडे देखील बघ. उगाच काहीही बोलून मुद्दा भऱकटवू नको. मी कोणाच्याही आईला काही बोलत नाही. तुझी आई दोन लाखांची साडी नेसत असेल. आम्हाला फाटक्या लुगड्यातील आमची आई प्रिय आहे. माझा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करता. परंतु, जेव्हा आमच्या आया-बहिणींना मारलं तेव्हा त्याचे व्हिडीओ का नाही शेअर केले?”