Manoj Jarange Patil vs Nitesh Rane Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर मंत्री नितेश राणे यांनी टीका केली आहे. जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडली जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांचे लोक रसद पुरवत आहेत असं राणे यांनी म्हटलं आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. जरांगे म्हणाले, “चिचुंद्रीचे पाय कोणी मोजलेत का? तसेच चिचुंद्री नुसती ओरडत असते, ती काय बोलते हे कोणालाच कळत नाही.”
नितेश राणे म्हणाले, “मला वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या समितीचे प्रमुख असून सदर समिती आंदोलकांशी चर्चा करत आहे. त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करताना सरकार मागे पुढे बघणार नाही. परंतु, या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. तसेच जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जात आहे. सर्व हिंदू समाज हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय.” नितेश राणे हे टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार मराठा आंदोलकांना रसद पुरवत आहेत : नितेश राणे
नितेश राणे म्हणाले, “आंदोलकांच्या ज्या गाड्या येत आहेत. पेट्रोल पंपांवर किंवा त्यांच्या यात्रेचा मार्ग पाहता त्यांना विविध लॉनमधून रोहित पवार सगळी रसद पुरवत आहेत. रोहित पवार यांची माणसं मदत करत आहेत. यावर रोहित पवारांनी उत्तर द्यावं. रोहित पवारांनी ही गोष्ट फेटाळली तर मी त्याचे पुरावे सादर करतो. मला कोणाचीही नावं घ्यायची नाहीत. परंतु, पेट्रोल पंप आणि लग्नांचे लॉन बूक करण्यात रोहित पवारांचा हात आहे हे मला माहिती आहे.”
चिचुंद्रीचे पाय कधी मोजलेत का? मनोज जरांगे पाटील
दरम्यान, मंत्री राणेंच्या वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “चिचुंद्रीचे पाय कधी मोजलेत का? चिचुंद्री लाल असते, तिला चार पाय असतात, ऊन असो अथवा पाऊस ती लालच राहते. ती काय बोलते ते कोणालाच कळत नाही. मात्र ती सतत ओरडत असते. मी त्या चिचुंद्रीबद्दल सध्या काही बोलणार नाही. आपलं हे आंदोलन संपू द्या. मग मी त्याच्याकडे बघतो. मी त्याच्या वरिष्ठांना सांगत होतो की याला आवरा पण आता मीच आंदोलन झाल्यावर बघतो.”