मराठा क्रांती मोर्चासह वेगवेगळ्या मराठा संघटना मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. मुंबईत पोहोचल्यावर मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या नेतृत्वात निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. मनोज जरांगे यांनी या पदयात्रेबाबत आणि उपोषणाबाबत माहिती देण्यासाठी काही वेळापूर्वी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला उपोषण आणि पदयात्रेत आडकाठी आणू नये असा इशारा दिला.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांना विचारलं की, तुमच्या या पदयात्रेत सरकार आडकाठी करेल असं तुम्हाला का वाटतंय? यावर उत्तर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणार नाही. या पदयात्रेला आडकाठी होणार नाही. परंतु, आम्हाला याआधी काही वाईट अनुभव आले आहेत. परंतु, यावेळी आम्ही आधीच सज्ज आहोत. त्यामुळे सरकारने अंतरवालीसारखा प्रयोग पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नये. तसं केल्यास सरकारला हे प्रकरण जड जाईल.

मनोज जरांगे सरकारला इशारा देत म्हणाले, मराठे मुंबईत केवळ आंदोलनासाठी, उपोषण करण्यासाठी येत आहेत. सगळं शांततेत होईल, परंतु, सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं. संयमाने चर्चा करून, मार्ग काढावा आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. बाकी कुठल्याही प्रयत्नात पडू नये.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने जर आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, आमच्या गाड्या रोखल्या, त्यासाठी डिझेल दिलं नाही किंवा जेवणासाठी गॅस दिला नाही, आमचं इंटरनेट बंद केलं, हेल्मेटची दुकानं बंद केली, तर आम्ही काय करायचं? आमच्याकडे काय पर्याय आहे? आम्ही डिझेलशिवाय गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. आम्ही असे नमुने आहोत की त्यांनी आम्हाला गॅस दिला नाही तर आम्ही त्याचीसुद्धा तयारी केली आहे. जेवण बनवण्यासाठी आम्ही लाकडं घेणार आहोत. चूल बनवण्यासाठी विटासुद्धा घेतल्या आहेत. परंतु, आम्हाला अशा पद्धतीने त्रास दिला तर तुमचं दूध बंद होणार हे नक्की.

हे ही वाचा >> “सरकारने आडकाठी केली तर आम्ही चारही बाजूंनी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला रोखलंत तर आमचा मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाही. आम्ही त्या दुधाचं दही किंवा तूप करू पण तुम्हाला देणार नाही. बाजरी, गहू, सोयाबीन आणि डाळी तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही हे सगळं खायचं नाही, कारण आम्ही देणारच नाही. तुम्ही टोपल्यांच्या काड्या काढायच्या आणि तेच खायचं. तुम्ही आम्हाला जसा त्रास देणार, तसा त्रास आम्ही तुम्हाला होणार.