अलीकडील काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण, छगन भुजबळांना का लक्ष्य करण्यात येत आहे? यावर जरांगे-पाटलांनी भाष्य केलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.

जरांगे-पाटील म्हणाले, “छगन भुजबळांचा १० ते १५ वर्षापासून मराठा आरक्षणाला विरोध आहे. ते कशामुळे विरोध करतात माहिती नाही. पण, मराठा आरक्षणाला विरोध करताना कुणा-कुणाची वाट लावली, हे सगळ्यांना माहिती आहे. विरोध आणि वैचारिक मतभेद असले पाहिजेत. छगन भुजबळांच्या विचारांना १०० टक्के विरोध आहे. मात्र, व्यक्ती म्हणून विरोध नाही.”

हेही वाचा : “जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहेत, पण…”, गोपीचंद पडळकरांची जरांगे-पाटलांवर टीका

छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मग, तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे? असा प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, “हा कुठला पाठिंबा आहे? कुणबी आरक्षणाच्या नोंदी आढळून आल्या आहेत. पण, तुम्ही ५० टक्क्यांवरील आरक्षण घ्या, असं सांगत आहात. ही कुठली पद्धत आहे? तुमची जमीन मुंबईत आढळली. मात्र, तुम्हाला पुण्यात जमीन घेण्याबद्दल सांगितलं, तर घेणार का?”

हेही वाचा : “छगन भुजबळ पागल झालेल्या माणसासारखं…”, ‘त्या’ आरोपावरून मनोज जरांगेंचा संताप

लाठीचार्ज झाल्यानंतर तिथेच होता का? की दुसरीकडे गेला होता? या प्रश्नावर जरांगे-पाटील म्हणाले, “काहीवेळासाठी मी बाजूला गेलो होता. कारण, तिथे खूप धूर होता. माझे नाक आणि तोंड पूर्ण बंद होत होते. या धुराने डोळे सुद्धा उघडत नव्हते. मी एका कडेला पडलो होतो. मी तिथून उठलोच नाही, कारण आरक्षणाचा चौथा दिवस असल्यानं मला चालताही येत नव्हते. धूर कमी झाल्यानंतर आरक्षणाच्या स्थळी आलो.”