मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी हजारो मराठा बांधवांसह मुंबईत येत मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलं होतं. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या होत्या आणि जीआर काढा हे त्यांचं सांगणं होतं. ज्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आलं आहे. मनोज जरांगेंनी त्यानंतर उपोषण सोडलं आहे. सरकारने जीआर काढल्यानंतर त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच ते छत्रपती संभाजी नगरलाही पोहचले आहेत. मनोज जरांगे यांनी रुग्णालयातून पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांचेही आभार मानले. शिवाय मराठ्यांनी संयम ठेवावा असंही आवाहन केलं.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

मराठ्यांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांनी खूप सहकार्य केलं, मदत केली त्याबद्दल सगळ्याचं अभिनंदन करतो आहे. विशेष करुन माझ्या गरीब मराठ्यांनी अखेर ही लढाई जिंकली. अनेक वर्षांपासून ही लढाई सुरु आहे. शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं आणि यशाचं श्रेय देतो. मी फक्त नाममात्र आहे सगळं यश त्यांनीच मिळवलं असं मनोज जरांगे म्हणाले.

सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार-जरांगे

मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील मराठ्यांनी शब्दांवर विश्वास ठेवा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यात काही शंका ठेवू नका, फक्त थोडा संयम ठेवा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना हैदराबाद गॅझेटियरचा आधार असणार आहे. त्यासाठीच त्याचा जीआर निघणं आवश्यक होतं. असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. पुढे जरांगे म्हणाले, जो १८८१ पासून जो जीआर नव्हता तो निघाला आहे. मराठ्यांचं हक्काचं गॅझेटिर होतं तरीही एक ओळही नव्हती. आता तो जीआर आला आहे. एखाद्या विदूषक किंवा अविचारी माणसावर विश्वास ठेवून संयम ढळू देऊ नका असं माझं सगळ्यांना माझं सांगणं आहे. सात कोटी गोर गरीब जनता आणि मी आम्ही मिळून निर्णय घेतो.

काही लोकांचं पोट दुखतं आहे-मनोज जरांगे

काही लोकांचं पोट यासाठी दुखतंय कारण त्यांचं राजकारण या सगळ्यावर सुरु होतं. काहींचं राजकारण यावर होतं ते आता कोलमडलं आहे. अनेक मराठा बांधवांना वाटतं पाटलांनी हे करायला नको होतं. मग त्यांना कळतं की माझं बोलणं योग्य होतं. शांत रहा, संयम ठेवा. सगळं व्यवस्थित होणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तिघांची समिती केली आहे. मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे यासाठी समिती केली आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांनी कुणाची जमीन बटाईने घेतली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.