Manoj Jarange : गरीबाची लेकरं मुंबईला गेली, जे मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅझेटियर आणि त्याचा जीआर निघाला. १०० टक्के सगळा मराठवाडा आरक्षणात जाणार आहे. मी नुसतं भाषण करत नाही मी तुम्हाला शब्द देतो आहे. असं मनो जरांगे यांनी म्हटलं आहे. नारायणगडावर त्यांनी जोरदार भाषण केलं. आपण सगळे मिळून आता दसरा मेळाव्याला भेटू असंही मनोज जरांगेंनी जाहीर केलं.

मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे आरक्षणात जाणारच-जरांगे

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीकडचे मराठे आरक्षणात जाणारच. काही लोक बोलत आहेत, त्यांना सोडून द्या. कारण त्यांना वाटतं की आपल्याला डोकं नाही, अक्कल नाही. आम्ही गरीबांची पोरं लढलो, आपल्या लेकीबाळी, पोरं लढलो. सगळ्यांनी एक विचाराने लढाई केली. तुम्हाला धोका कधी आहे? मी जर फुटलो तरच. पण काहीही झालं तरी असं होणार नाही. सगळा समाज एकत्र आला, ही मेहनत मी वाया जाऊ देणार नाही. मी जर फुटलो तर खुशाल शंका घ्या. आपण एकमेकांना नाही फसवणार. मला वाटलं असतं तर मी माझंच कुटुंब मोठं केलं असतं. हैदराबाद गॅझेट बाबत शासनाने जीआर काढला आहे. त्यामुळे सगळे मराठे आरक्षणात जाणारच. नाही घेतले तर त्यांना महाराष्ट्रच बंद करु, फिरुनच देणार नाही असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

पुन्हा लढायची वेळ आली तर मी मागे हटणार नाही-जरांगे

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “पुन्हा लढायची वेळ आली तरीही मी मागे हटणार नाही. समाजाच्या स्वाभिमानापेक्षा मी जर माझ्या स्वार्थाचा विचार केला असता तर समाज खचला असता. माझा कुणीही अपमान करु द्या मी ताकदीने लढतो आहे. माझ्या समाजाची मान मी खाली होऊ देणार नाही. एखादी गोष्ट दोन, चार महिने उशिरा मिळेल. पण स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. एखाद्याच्या काळजात घाव झाला तर तो काही बोलत नाही. तो त्याला प्रतिष्ठेचा अपमान वाटतो. मी समाजाला विजयीच केलं आहे हरु दिलेलं नाही. आमच्याकडे आहे का पुस्तक? पण आम्ही आरक्षण आणलं ना? येवलेवाला तर कुठे तरी पळून गेला. त्याला काही मेळच लागेना” असं म्हणत छगन भुजबळ यांना मनोज जरांगेंनी टोला लगावला.

जीआर निघाल्यापासून खूपच अभ्यासक झाले आहेत-जरांगे

एखाद्याने सांगितलं आरक्षण हुकलं म्हणून ते हुकत नसतं. जर चुकलं तर नवा जीआर काढावा लागेल हे तिथेच सांगितलं आहे. हैदराबाद गॅजेट लागू केलं, आता आम्हाला माहीत नाही प्रमाणपत्र द्यायचं. त्याशिवाय मिळणारच नाही. अभ्यासक, वाचक, तज्ज्ञ इतके झाले आहेत. जीआर निघाल्यापासून खूप अभ्यासक झाले आहेत. काही गैरसमज करुन घेऊ नका, आरक्षण मिळालं नाही तर दूध, भाजीपाला सगळं बंद करायचं आता असंही मनोज जरांगेंनी सांगितलं. महाराष्ट्र आपलं राज्य आहे, मुंबई आपली आहे. मुंबईचे विचार पोरांनी जिवंत केले आहेत. आपण दुसऱ्याच्या बुद्धीने वागलो तर वाटोळं होईल आपलं एवढं लक्षात ठेवा. दोन दिवस अभ्यासकांनी गोंधळ निर्माण केला होता. मी सांगितलं कुणाकडे लक्ष देऊ नका. आपल्या समाजाला काही मिळायला लागलं की हे अभ्यासक येतात. मराठ्यांनी खूप मोठी लढाई जिंकली आहे. असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.