Manoj Jarange मनोज जरांगे यांनी आज संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर माझा आणि मराठा समाजाचा विश्वास नाही हे पुन्हा एकदा म्हटलं आहे. तसंच आता आरक्षणाच्या जीआरबाबत बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. आरक्षणात सगळ्या मराठ्यांना घालणारच मी मराठ्यांचा नोकर आहे आणि समाजासाठी काम करतो आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“गरीब मराठ्यांचं हित होणार असेल तर काहीही प्रश्न नाही. उपसमिती करा, कुणीही टोळ्या पाठवल्या काही फरक पडणार नाही. गरीब मराठा बांधवांना मी आरक्षण मिळवून देणार हे सगळ्यांना माहीत आहे. मराठ्यांना ओबीसीमध्ये आम्ही जाणारच. कोण काय म्हणतं त्याने काही फरक पडत नाही. मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणारच. दलित मुस्लिमांसाठी उपसमिती नेमा, शेतकऱ्यांसाठी नेमा आणि मायक्रो ओबीसींसाठी उपसमिती नेमा अशीही मागणी मी करतो.” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

माझं मराठ्यांना सांगणं आहे की..

आमच्यात कुणीही संभ्रम निर्माण केला तरीही मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि माझा समाजही विश्वास ठेवणार नाही. उठलं की टीव्हीवर जाऊन बोलायचं. बाकी हे कशाला येत नाहीत ना बैठकांना येतात, ना बोलवल्यावर चर्चा करायला येत नाहीत. कुरापती काढून संभ्रम निर्माण केला जातो आहे पण मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या. मराठवाड्यातल्या सगळा मराठा मी आरक्षणात घालणार. काही दिवसांत मराठ्यांना हे दिसणार आहे. मराठ्यांनी संभ्रम निर्माण करुन घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आहे.

संजय राऊत यांच्याबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?

एकनाथ शिंदे बिचारा माणूस आहेत, आम्ही त्यांच्या सांगण्यावरुन नाही आलो. आरक्षणासाठीच आलो. संजय राऊत काहीतरी राजकीय बोलले असतील. आम्हाला आरक्षण नको होतं आम्ही फक्त फडणवीसांची कोंडी करायला आलो होतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीसांना घेरायचं असतं तर आम्ही रागात जाऊन धडकलो असतो ना वर्षा बंगल्यावर. मी मराठ्यांचा नोकर आहे. राष्ट्रवादी दोन्ही, दोन्ही शिवसेना, काँग्रेसला, भाजपाला कुणालाही मोजत नाही. मी रिझल्ट देणारा माणूस आहे. मुंबईत जाणार हा शब्द दिला होता, मी जाऊन दाखवलं. दुसरा शब्द जीआर बाबत दिला होता. एकनाथ शिंदेंचं ऐकून काही करायचं असतं तर गेल्या गेल्याच वर्षा बंगल्यावर आंदोलन केलं असतं. आम्हाला आरक्षणच हवं आहे, बाकी काही नाही. मी संजय राऊत काय म्हणाले ते मी नाही पाहिलं. जीआर निघाला आहे आता तिथे झोपून राहून दंगली घडवायच्या होत्या का? गॅझेटियरचा जीआर निघाला आम्ही मुंबईतून निघालो असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.