लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरीतूनच ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ची सुरुवात करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले आहे. रत्नागिरीतील ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख प्रदिप (बंड्या) साळवी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदेच्या शिवसेनेत शुक्रवारी प्रवेश केला.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतूनच ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ची आम्ही सुरुवात केली असल्याचे सांगितले. या पक्षप्रवेशानंतर पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, आपले पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावनिक आणि संवेदनशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिवसेना मजबूत करायची आहे. महायुती म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांची निवडणुका लढताना या मतदारसंघातील अकरा जिल्हा परिषद गटांसह जिल्हा परिषदेत दोन तृतीयांश बहुमताने शिवसेना कशी निवडून येईल यासाठी आता प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे. खरंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होत आहेत. रत्नागिरीतील ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी काम केलं पाहिजे. जे नव्याने पक्षात सहभागी होत आहेत त्यांचे स्वागत करताना जुन्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याची तितकीच काळजी घेतली जाईल असे सामंत यांनी सांगितले. मात्र आगामी निवडणुकीमध्ये जो निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाईल असंही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, गाव किंवा वार्ड पातळीवरचे आपापसातील वाद हे निवडणुकीमध्ये दिसता कामा नाहीत. आता सहकार, कामगार क्षेत्राबरोबरच पक्षात नवीन पिढी पुढे आली पाहिजे. यासाठी पक्षातील ज्येष्ठांनी कामाला लागलं पाहिजे. बंड्या साळवी यांच्या कर्तृत्वावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देत आगामी सर्व ग्राम पंचायतीसह सर्व निवडणुका जिंकूया असाही निर्धार या वेळेला सामंत यांनी केला. यावेळी सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून घोषित केल्याची घोषणा केली.

यावेळी व्यासपीठावर राजापूर लांजा विधानसभा मतदार संघ आ. किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला आघाडी प्रमुख शिल्पा सुर्वे यांच्यासह माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, महेंद्र झापडेकर, अभय खेडेकर, अनुष्का खेडेकर, देवयानी झापडेकर यांच्यासह पक्षप्रवेश करणारे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळेला बंड्या साळवीसह प्रमुख शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मोठ्या संख्येने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मालगुंड, हरचेरी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने उभा त्या गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली तीस वर्ष आपले शिव धनुष्याशी नाते होते. मात्र फक्त गेली अडीच वर्ष मी या शिवधनुष्यापासून लांब गेलो होतो. मात्र आता पुन्हा एकदा आम्ही शिवधनुष्य खांद्यावर घेतला आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील. तसेच उबाठातील उरलेले सुद्धा पक्षप्रवेश करतील. यापुढे आम्ही चूक दुरुस्त करणार आहोत आणि पालकमंत्री सामंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी ग्वाही बंड्या साळवी यांनी दिली.