अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगदार ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला. विजयानंतर धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली आहे. काहीही झालं असलं तरी रक्ताचं नातं आहे. त्याचं वाईट वाटतं, असं सांगताना धनंजय मुंडे भावूक झाले.
प्रचारापासून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत धनंजय मुंडे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीत पंकजा मुंडे पिछाडीवर पडत गेल्या आणि धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विजय मिळविला. धनंजय मुंडे यांना १ लाख २२ हजार ११४ मते मिळाली, तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ९१ हजार ४१३ मते मिळाली. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ इतक्या मतांनी पराभव केला.
विजयानंतर धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करीत सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर माध्यमांशी बोलतांना मात्र, ते भावूक झाले. धनंजय म्हणाले, “माझ्या अंगाला विजयाचा गुलाल लागावा, अशी इच्छा होती. आज मात्र माझ्या अंगाला लागलेला गुलाल बघायला ते नाहीत. मला जनतेनं खुप प्रेम दिलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एकीकडं या विजयाचा आनंदही आहे आणि दुसरीकडं खंतही आहे. कारण ते (पंकजा मुंडे) मानत नसलं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. मनात कुठेतरी आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्तीचा हा पराभव आहे. त्यामुळे मनात खंत आहेच,” असं सांगताना धनंजय मुंडेंच्या डोळ्यात पाणी तरळले.
मराठवाड्यातील आणि राज्यातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई परळी विधानसभा मतदारसंघात होती. राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि नेत्या पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकमेकांविरूद्ध निवडणूक लढवत होते. दोन्ही नेते त्यांच्या पक्षाचे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. त्यात मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.