सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या आरक्षणाला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र हे आरक्षण देताना ‘ओबीसीं’वर अन्याय होणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाबळेश्वर येथील आरपीआय विचारमंथन शिबिरात स्पष्ट केले.

आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरास आठवले, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

आठवले म्हणाले, की मराठा समाजाला न्याय मिळायला हवा. राज्य सरकारने या समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. तेही व्यवस्थित समजावून सांगणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना करतो की, त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाच्या नेत्यांबरोबर बैठक करावी आणि चांगला तोडगा काढावा. मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे. मात्र ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.

दरम्यान, आमच्या पक्षाची मूळ भाजपबरोबर युती आहे. आमचे कार्यकर्ते स्वबळावर निवडून येऊ शकत नाहीत. मात्र आमच्या पक्षाला सत्तेमध्ये कोणता वाटाही मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जिल्हानिहाय नियोजन समित्या, कोणतेही महामंडळ अथवा इतर सत्तापदे मिळत नाहीत. पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागावाटप करताना आमच्या पक्षाचाही भाजपने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्वबळावर निवडून आले पाहिजेत. सर्व धर्मांच्या लोकांना पक्षात आणून पक्ष व्यापक करावा. त्या पद्धतीने गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळत आहे. त्याप्रमाणे खासगी उद्योगांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायला हवे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि महापालिका यामध्येही महिलांना आरक्षण मिळायला हवे. असे आरक्षण मिळत नसून ते मिळाले पाहिजे असा ठराव करण्यात आला. भूमिहीनांना पाच एकर जमीन द्यावी. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखी नवीन चळवळ उभारणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, त्यांनी ती गरिबांमध्ये वाटावी असेही आठवले म्हणाले. देशामध्ये हिंदी, प्रबोध विश्वविद्यापीठ आहे. त्याप्रमाणे पाली विद्यापीठ व सामाजिक शास्त्र विद्यापीठ सरकारने उभे करावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षात नवीन विचारांची फळी तयार करण्यात येईल. सर्व समाजाला, ज्यांना ज्यांना आंबेडकरांचे विचार मान्य आहेत, त्या सर्वांना पक्षात सामील करून घेतले जाईल. सर्व समाजांना एकत्र करून परिवर्तन चळवळ उभी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. या वेळी स्वप्नील गायकवाड आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.