Ketaki Chitale Judicial Custody : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

केतकीच्या पोस्टनंतर सर्वच पक्षांकडून निषेध

केतकी चितळेनं दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर त्यावर सर्वत स्तरातून आणि पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. राज्यात १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी चौकशीनंतर ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतकीला कळंबोलीमधून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी देखील धाड टाकून तपास केला होता. यामध्ये केतकीचा लॅपटॉप आणि इतर काही वस्तू पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. केतकीच्या अटकेनंतर तिच्या विरोधात जशा प्रतिक्रिया उमटत आहेत, तशाच काही तिच्या समर्थनार्थ देखील येत आहेत.

केतकीच्या अटकेसाठी पोलीस वेटिंगवर!

दरम्यान, केतकी चितळेला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पोलीस वेटिंगवर असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. आज केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर देहूरोड पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात हजर होते. मात्र, त्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिच्या कस्टडीची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांआधी गोरेगाव पोलीस तिच्या अटकेसाठी तयार होते. त्यामुळे आधी गोरेगाव, नंतर पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर देहूरोड पोलिसांकडून आता केतकी चितळेला अटक केली जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये ‘तुका म्हणे’, या शब्दांचा वापर केल्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने तिच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला ऊत

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केतकीनं न्यायालयात स्वत:ची बाजू स्वत: मांडल्याचं सांगत याबद्दल तिला मानलं पाहिजे, असं म्हटल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचवेळी तृप्ती देसाई यांनी देखील केतकी चितळेनं शरद पवारांचं नाव घेतलेलं नाही असं म्हणत तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका केली जात आहे.