नांदेड : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात येथे मंजूर झालेल्या शासकीय कृषी महाविद्यालयातून माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले होते; पण आता राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर नांदेडमधील या महाविद्यालयास शंकररावांचे नाव देण्याच्या प्रस्तावास मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येणार आहे.

नांदेडमध्ये शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली १० वर्षांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. काँग्रेस आघाडी तसेच नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत या महाविद्यालयाच्या स्थापनेस मंजुरी मिळाली नव्हती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाठपुरावा करून वरील महाविद्यालयास तसेच तेथील नव्या पदांनाही मंजुरी आणली होती. पण शिंदे सरकारने या महाविद्यालयाला कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव दिले नव्हते.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी गेल्यावर्षी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ ते या पक्षाचे खासदारही झाले; पण नांदेडच्या कृषी महाविद्यालयाला शंकररावांचे नाव देण्याचा विषय मागील वर्षभरात चर्चेत आला नव्हता. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कन्हैया कदम यांनी या महाविद्यालयाला पद्मश्री श्यामराव कदम यांचे नाव देण्याची मागणी केली होती. अन्य काही नावेही सुचविली गेली; पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक असलेल्या भागवत देवसरकर यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीसमोर कृषी महाविद्यालयाला शंकरराव चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास मंजुरी देण्यात आली असल्याच्या माहितीला विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणीकर यांनी दुजोरा दिला.

कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचा हा ठराव आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविण्यात येईल. या परिषदेच्या मंजुरीनंतर तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाईल. त्यानंतर शासन मान्यतेने नामकरण होऊ शकते, असे सांगण्यात आले. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शंकररावांचे नाव आहे. तसेच शारदा भवन शिक्षण संस्थेतही एका महाविद्यालयाला त्यांचे देण्यात आले आहे. आता कृषी महाविद्यालयासाठी त्यांच्याच नावाची शिफारस झाली आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठाने शंकरराव चव्हाण, खा.शरद पवार, शिवराज पाटील चाकुरकर इत्यादी राजकीय नेत्यांचा मागील काळात मानद पदवीने सन्मान केला. अलीकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर कार्यकारी परिषदेने आता विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनाही डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्याची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव देवसरकर यांनीच मांडला होता.