केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवारी प्रथमच स्वत:च्या गावी सत्कार स्वीकारण्यासाठी येणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी बंडू काटुळे यांनी २० क्विंटल फुले मागविली होती. गुलाब फुलांचा मोठा हार बनविला होता. याशिवाय जागोजागी होणाऱ्या सत्कारासाठी वेगवेगळी फुले होती. काही नांदेडमधून मागविलेली, तर काही लातूरहून.. मात्र, सकाळीच मुंडे यांचे निधन झाल्याचे वृत्त धडकले, तेव्हा त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. सत्कारासाठी आणलेली फुले पार्थिवावर वाहण्याची वेळ आली.. मंगळवारी दिवसभर बीड जिल्ह्य़ात एकही दुकान उघडले नाही. चौका-चौकांत थांबलेल्या तरुणांनी ‘गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असे फलक लावले होते. अश्रूंचा बांध आवरणे कोणालाही शक्य नव्हते. परळी गावात तर चूलही पेटली नाही. मराठवाडय़ातील दिग्गज नेता हरवल्याची प्रतिक्रिया जशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडी होती, तशीच किंबहुना त्यापेक्षाही ओलाव्याची प्रतिक्रिया ऊसतोड कामगारांमधून उमटली. जगण्याचे बळ देणारा नेता हरवल्याचे प्रत्येक जण एकमेकांना सांगत होता.
भाजपच्या ‘सोज्वळ’ चेहऱ्याला बहुजन वर्गाशी जोडणारा नेता अशी मुंडे यांची महाराष्ट्रभर ख्याती होती. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या अकाली मृत्यूनंतर संपूर्ण जिल्हाभर दिसत होते.
परळी रस्त्यावर भेटलेल्या दिंद्रुड येथील रहिवासी राम राठोड यांनी सांगितले, मोठा संघर्षशील माणूस होता. तसा माझा त्यांच्याशी फारसा संपर्क झाला नाही. पण माझी दोन्ही मुले ऊसतोडीस जातात. ते मुंडे यांना नेता मानत आणि आम्हीही त्यांना नेता मानायचो. ऊसतोड कामगारांच्या हिताचे त्यांनी बरेच निर्णय घेतले.. याच रस्त्यावर राठोड यांच्याशेजारी उभ्या तरुणांनी सांगितले, त्यांचे निधन झाले यावर अजूनही विश्वास ठेवता येत नाही. हे सारे अघटितच आहे.
बीड शहरात पोहोचल्यानंतर चौकाचौकांत मुंडे यांच्या स्वभावाचे पैलू दाखविणाऱ्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांचे फलक आणि त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशी अक्षरे या पलीकडे कार्यकर्ते, माणसे बोलण्यास तयार नव्हती. बीड, गेवराई, माजलगाव या शहरांतील दिवसभराचे व्यवहार अक्षरश: ठप्प होते. उद्या (बुधवारी) होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात प्रशासकीय अधिकारी व्यस्त होते.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली. दुपारनंतर कोणत्या वरिष्ठ मंत्र्यासाठी कोठे वाहनतळ करायचे, कोणते हेलिकॉप्टर कोठे उतरवायचे, याचे नियोजन सुरू होते. सायंकाळपर्यंत १५ हेलिपॅड बनविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले आहे. अंत्यविधीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह ११५ जण विशेष विमानाने लातूर येथे येतील, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजू जावडेकर यांनी सांगितले.