छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२५ या वर्षीचे वाङ्मय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यंदाच्या पुरस्काराचे वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे हे मानकरी ठरले. लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली आहे.
‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार’ वंदना पारगावकर (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘अनोखे थायलंड’ या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ‘प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार’ सचिन कुसनाळे (म्हैसाळ) यांना ‘गांधी : वाद आणि वास्तव’ या वैचारिक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे. ‘बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार’ पांडुरंग मुरारी पाटील (राधानगरी) यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर झाला आहे. रोख तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार’ मागील अर्ध्या शतकापासून ग्रंथवितरण व प्रकाशन क्षेत्रात काम करणारे कैलाश पब्लिकेशन संस्थेचे अनिल अतकरे (छत्रपती संभाजीनगर) यांना जाहीर झाला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेने संजीव कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने ग्रंथ निवड केली आहे. या समितीत डॉ. विश्वाधार देशमुख व सुहास देशपांडे सदस्य होते. रा. ज. देशमुख स्मृती पुरस्काराची निवड डॉ. दादा गोरे, डॉ. अनिरुद्ध मोरे आणि डॉ. विष्णू सुरासे यांच्या समितीने केली आहे.