महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (MARD) करोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आजपासून (१ ऑक्टोबर) अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. या संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी (३० सप्टेंबर) रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू झाली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सायनच्या लोकमान्य टिळक म्युनसिपल मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली आहे.

“आम्हाला लेखी आश्वासन हवं आहे. रुग्णांच्या सेवेमध्ये तडजोड होणार नाही, याची दक्षता घेत आम्ही आपत्कालीन सेवा बंद केली नाही. शैक्षणिक शुल्क माफ केलंच पाहिजे कारण करोना काळादरम्यान शैक्षणिक हालचाली मंदावल्या होत्या. त्याचसोबत, वसतिगृहांची स्थिती देखील चांगली नाही. त्याचसोबत, बृहन्मुंबई महानगरपालिका देखील डॉक्टरांच्या वेतनातून कर कापत आहे”, असं मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

निवासी डॉक्टर हे गेले जवळपास दीड वर्ष करोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवलेला नाही. म्हणूनच, गेल्या अनेक महिन्यांपासून शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, त्यानंतरही यावर विभागाने ठोस कार्यवाही केलेली नाही. दरम्यान, हा संप सुरु असला तरी आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील असं मार्डने स्पष्ट केलं आहे.