सजले रे क्षण माझे, सजले रे.. अशी काहीशी अवस्था होती पूजा महंमद मोमीन हिची. एका अनाथ मुलीचे जीवन नव्याने सुरू होत होते… सनई चौघडय़ांच्या सुरात यशवंत पोतदार यांच्याशी विवाहबंधनाने..पूजा महंमद मोमीनची पूजा यशवंत पोतदार झाली. पूजाचे वयाच्या १८ वर्षांपर्यंतचे सांगलीच्या वेलणकर बालकाश्रममधील जीवन फुलत आणि बहरत आहे या नव्या नात्याने..
लहानपणी रक्ताची नाती हरवलेल्या पूजाला वेलणकर बालकाश्रमाचा आसरा मिळाला. त्यानंतर ऑक्टोबर २०१३ मध्ये ती येथील तेजस्विनी महिला वसतिगृहामध्ये राहायला आली. त्यानंतर मात्र भावी आयुष्याच्या आशा पूजाच्या मनात रुंजी घालू लागल्या. तिच्या भावना संस्थेच्या अधीक्षका ज्योती पाटील यांनी जाणल्या. महिला व बालविकास विभागाच्या विवाहाद्वारे पुनर्वसन करण्याच्या असलेल्या नियमाच्या अधीन राहून तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे गावातील यशवंत किसन पोतदार आणि पूजाने एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून पसंत केले. यशवंत शिल्पा कटलरी अँड स्टेशनरी हे दुकान चालवतात. त्यांची रीतसर चौकशी आणि कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत विवाहाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांना सादर करून विवाह मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर विधिवत विवाहाची प्रक्रिया संस्थेद्वारे पार पाडली. पूजाचे कन्यादान खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे आणि वैशाली उमेश आपटे यांनी थाटामाटात केले. वसतिगृहाच्या टेरेसवर रांगोळी, हळदी आणि मांडव अशा रीतसर पद्धतीने हा विवाहसोहळा सजला. या मंगल प्रसंगी संस्थेच्या स्थानिक समितीचे सदस्य तसेच सर्वसमावेशक विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचे सदस्य तसेच समाजातील दानशूर व्यक्तींचे अनमोल सहकार्य लाभले.
संस्थेने राज्यामध्ये सर्वप्रथम सुरू केलेल्या सर्वसमावेशक विवाहपूर्व समुपदेशन केंद्राच्या सदस्यांमार्फत नववधूला विवाहपूर्वीच शरीररचना, कुटुंब व्यवस्था, लंगिक शिक्षण, गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, बालकाचे पोषण आणि आरोग्य महिला आणि बालकाकरिता उपलब्ध शासकीय योजना आणि कायदे, तसेच सायबर समुपदेशन इत्यादी विषयाबाबत संबंधित तज्ज्ञांकडून प्राप्त सखोल मार्गदर्शन झाले. यामुळे लहानपणापासून संस्थेत वाढलेल्या पूजाला तिच्या भावी आयुष्यामध्ये सुखी संसारचा मूलमंत्र प्राप्त झाल्याचे समाधान संस्थेच्या अधीक्षका ज्योती पाटील यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2014 रोजी प्रकाशित
अनाथ पूजाचा विवाह घडला समाजाच्या साक्षीने
सजले रे क्षण माझे, सजले रे.. अशी काहीशी अवस्था होती पूजा महंमद मोमीन हिची. एका अनाथ मुलीचे जीवन नव्याने सुरू होत होते... सनई चौघडय़ांच्या सुरात यशवंत पोतदार यांच्याशी विवाहबंधनाने..पूजा महंमद मोमीनची पूजा यशवंत पोतदार झाली. पूजाचे वयाच्या १८ वर्षांपर्यंतचे सांगलीच्या वेलणकर बालकाश्रममधील जीवन फुलत आणि बहरत आहे या नव्या नात्याने..

First published on: 06-07-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage of orphan puja momin