महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी मास्कबाबत राज्य सराकरचं नेमकं आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.

राज्यात मास्कची ‘सक्ती’ नाही

मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. “मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवलं आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं की जिथे गर्दीची ठिकाणं आहेत, तिथे मास्क वापरण्याचं आवाहन करावं. ते सक्तीचं नाही”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन

“१० ते १५ दिवस जी सध्या रुग्णवाढ झाली आहे त्या दृष्टीकोनातून गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा. खुल्या ठिकाणी त्यात शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण, बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडून तीन पानांची नोट काढण्यात आली असून ती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे”, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे.

मास्कसक्तीबाबत १५ ते २० दिवसांनंतर निर्णय

दरम्यान, पुढील १५ ते २० दिवस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मास्कसक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. “१५ ते २० दिवस आपण परिस्थितीचा आढावा घेउयात. त्यानंतर मास्कबाबत सक्ती करायची की नाही? याबाबतचा निर्णय कळवण्यात येईल”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

…तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल – अजित पवारांचा सूचक इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रुग्णसंख्येमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही”

“रुग्णसंख्या जरी या भागांमध्ये वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात नगण्य वाढ झालेली आहे. त्यामुळे या बाबतचे रुग्ण फ्लूच्या आजारासारखे पॉझिटिव्ह होत आहेत आणि बरे होत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. जे लोक पॉझिटिव्ह होत आहेत, ते त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच बरे होत आहेत असं माझं निरीक्षण आहे”, असं त्यांनी नमूद केलं.