अहिल्यानगर: महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच शहर काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणारे हे पदाधिकारी आज, शनीवारी सायंकाळी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नगर शहरात काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीमधीलच घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने, आघाडीतील काँग्रेसला हा धक्का दिल्याचे मानले जाते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलात लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धाडले आहेत.

राजीनामा देणारे काँग्रेसचे पदाधिकारी आज सायंकाळी मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यावेळेस उपस्थित राहतील. ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हा प्रवेश होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु नगर शहराची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेली. त्यानंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद बराच काळ रिक्त होते. काही दिवसांपूर्वीच या पदावर दीप चव्हाण यांची नियुक्ती होत नाही तोच, काँग्रेसच्या शहरातल्या इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. श्री जयंत वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद अद्यापही रिक्तच आहे.

राजीनामा देताना मनोज गुंजेचा यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही आदराची भावना आहे. परंतु किरण काळे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाली. शहरात आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही किरण काळे यांचे नेतृत्वखाली ठाकरे गटात प्रवेश करत आहोत.

महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत‌ सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर हरकती व सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दि. ९ ऑक्टोबरनंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. असे वातावरण असतानाच काँग्रेस पक्षाला हा धक्का बसला आहे.