पर्यटन महोत्सवातून देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश
माथेरान नगर परिषद, माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझायर ग्रीन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांबरोबरच राष्ट्रीय आणि २० देशांतील आंतरराष्ट्रीय कलाकारदेखील कार्यक्रम सादर करणार आहेत.
कलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम हे या ग्रीन फेस्टिव्हलचे वैशिष्टय़ असणार आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. म्यूरल्स, कॅन्व्हास पेंटिंग, स्क्लप्चर, पेपरमँश, निसर्ग छायाचित्र प्रदर्शन या माध्यमांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. देशभरातील नामांकित चित्रकार, मूर्तिकार, छायाचित्रकार यात सहभागी होणार आहेत.
माथेरानमध्ये येत्या २० मे ३० मे या कालावधीत पर्यटन महोत्सवाची धूम असणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून या वेळेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला ग्रीन फेस्टिव्हल असे नाव देण्यात आले आहे. २० ते २५ देशांमधील कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहे. यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, इंग्लंड, जर्मनी आदी देशांतील कलाकारांचा समावेश असणार आहे. रोज संध्याकाळी सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात शास्त्रीय संगीताबरोबरच, रॉक, फोक आणि इन्स्ट्रमेंटल बॅण्ड पथकांचा समावेश असणार आहे.
निसर्ग व पर्यावरण क्षेत्रांत काम करणारे जागतिक कीर्तीचे लोक या माथेरान ग्रीन महोत्सवात सहभागी होणार आहेत. टाकाऊ वस्तूंपासून पुनर्निर्माण करून पर्यावरणाचे संतुलन कसे राखता येईल याची माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती माथेरान महोत्सवाचे समन्वयक सिद्धार्थ पाठक यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matheran tourism festival
First published on: 20-05-2016 at 01:09 IST