पुणे : मार्चमधील उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केले असतानाच एप्रिलमध्येही मुंबई आणि कोकण परिसरासह प्रामुख्याने उत्तरेकडील बहुतांश भागांत दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी (३१ मार्च) जाहीर केला आहे.

सध्याची तापमानवाढ तीन दिवस कायम राहणार असून, विदर्भातील काही भागांत पुढील तीन दिवस, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दोन दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.

दक्षिण आणि पूर्वोत्तर भाग वगळता देशात निम्म्याहून अधिक भागात सध्या उष्णतेची लाट आहे. उत्तरेकडून कोरडे आणि उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. राज्यातही कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. विदर्भात राज्यातीलच नव्हे, तर देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. राज्यात सर्वच शहरे आणि जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीच्या पुढे नोंदिवले जात आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अद्यापही तीव्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात २ ते ३ अंशांनी पुढील तीन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे.

राज्यात उष्णतेच्या लाटा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने एप्रिल महिन्यातील तापमानाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.   दरम्यान, विदर्भात इतर भागांतही कमाल तापमान ४१ ते ४३ अंशांदरम्यान आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेड जिल्ह्यांत ४१ अंशांपर्यंत तापमानाचा पारा आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांत उन्हाच्या झळा तीव्र आहेत. मुंबईसह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या जवळ आहे.

चंद्रपूर ४४ अंश सेल्सिअस

विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र आहेत. चंद्रपूर येथे राज्यातीलच नव्हे, तर देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. गुरुवारी तेथे ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

तापभान..

देशातील पश्चिम-उत्तर भाग, मध्य भारत आणि महाराष्ट्र, छत्तीसगडपर्यंत एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात तापमान अधिक राहणार असल्याचे दिसून येत आहे.

येथे झळा अधिक..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, बुलढाणा, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, औरंबागाद, जालना, हिंगोली आदी जिल्ह्यांत तापमानाचा पारा एप्रिलमध्येही चढा राहण्याची शक्यता आहे.