आदिवासी आणि वन विभागामध्ये संघर्ष
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांमधील सुमारे दोनशेच्या वर गावकरी शनिवारी पोलीस आणि वन विभागाच्या बंदोबस्ताला झुगारून पायवाटेने त्यांच्या मूळ गावी पोहोचले. यामुळे आदिवासी गावकरी आणि वनविभागामध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे असून या गावकऱ्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
मेळघाटातील नागरतास, अमोना, बारूखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा बु., सोमठाणा खूर्द आणि केलपाणी या आठ गावांमधील आदिवासींचे पुनर्वसन काही वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यात करण्यात आले. पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करीत आदिवासी त्यांच्या मूळ गावी परतणार असल्याचा इशारा माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दिला होता. आदिवासींनी या भागात प्रवेश करू नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले होते. या गावांच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खटकाली, गुल्लरघाट, केलपाणी, शहानूर, सोमठाणा, नागरतास, झरी नाका, मोहपाणी, वाघामाता, बारूखेडा, तलई, पोपटखेड येथील वनतपासणी नाक्यांवर वनरक्षकांसह पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पण, शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोपटखेड गेटमधून बाहेर पडून दोनशे लोकांना जमाव अकोट-हरीसाल रस्त्याने खटकाली गेट जवळ जमला. तेथून हे लोक सुलई नाला चौकीवर पोहोचले. त्यांना या दोन्ही ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनकर्मचाऱ्यांनी अटकाव केला, पण आदिवासी गावकऱ्यांनी त्यांना न जुमानता समोर कूच केले. जोपर्यंत राजकुमार पटेल येणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. राजकुमार पटेल हे तीन सहकाऱ्यांसह धारणीहून जीपने खटकाली गेटच्या दिशेने निघाले. त्यांना ढाकणा नाक्यावर अडवण्यात आले. परंतु दुचाकीचा वापर करून ते या स्थळावर पोहोचले. या काळात अंदाजे पाचशे लोकांचा जमाव जमला होता. यावेळी पटेल यांनी लोकांना वनक्षेत्रावर अतिक्रमण करण्याबाबत चिथावणी दिल्याचा आरोप आहे. भर रस्त्यावर जंगलामध्ये अकोट-हरीसाल मार्गावर पटेल यांनी जमावाला संबोधित केले. यावेळी वन अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. राजकुमार पटेल नंतर त्या ठिकाणाहून धारणीकडे निघून गेले.काही लोकांनी वनविभागच्या आश्वासनानंतर पुनर्वसित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे तीनशे गावकऱ्यांना पोलीस वाहनांमध्ये बसवून त्यांच्या गावी सोडण्यात आले. पण, दोनशे लोकांनी मात्र जुन्या गावच्या वनक्षेत्राकडे कूच केले. पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी त्यांना आपल्या गावी परत जाण्याची विनंती केली. पण, ते जुन्या गावाच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. सायंकाळपर्यंत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. राजकुमार पटेल हे भाजपचे नेते आहेत. सरकारच्याच विरोधात पटेल यांनी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेळघाटातील पुनर्वसनाच्या कामाला यामुळे खीळ बसणार असून पुनर्वसनासाठी चढाओढ लागलेल्या गावांच्या पुनर्वसनावर सरकार नकारात्मक भूमिका घेऊ शकते, अशी भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.
सकारात्मक तोडगा निघाला तरच विचार करू – पटेल
आदिवासींच्या मागण्यांवर वनविभाग व महसूल प्रशासन सकारात्मक तोडगा काढणार असेल तरच पुनर्वसन केलेल्या गावात जाण्याचा विचार करण्यात येईल, अन्यथा आदिवासी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती माजी आमदार राजकुमार पटेल यांनी दिली.