दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे वर्षभरात नगर जिल्ह्य़ात स्मारक उभारण्याची व त्यांच्या आठवणींची स्मरणिका प्रकाशित करण्याची घोषणा खासदार दिलीप गांधी यांनी नगरमध्ये आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत केली. गितेवाडी (ता. पाथर्डी) येथे उभारल्या जात असलेल्या सांस्कृतिक भवनासही मुंडे यांचे नाव देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंडे यांचा अस्थिकलश काल रात्री मुंबईहून येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात आणण्यात आला. उद्या, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रवरा संगम येथे अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे, त्यानिमित्ताने रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली आयोजित करण्यात आली होती.
मुंडे लढवय्या नेते होते, त्यांनी देश व समाजहितासाठीच देह झिजवला, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. ग्रामविकासाची प्रचंड धडपड असणा-या मुंडे यांना ग्रामविकासमंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राच्या विकासाची मोठी संधी निर्माण झाली होती, परंतु त्यांच्या अचानक निधनाने मोठी हानी झाल्याचे प्रतिपादन राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मुंडे राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे होते, याची आठवण सांगितली. आ. अनिल राठोड यांनी मुंडे यांच्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला घरातील माणूस गेल्याचे दु:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. आ. चंद्रशेखर घुले यांनी साखर संघाचे अध्यक्ष असताना आपल्याकडे ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांसाठी कशी पक्षविरहित चर्चा करत, याच्या आठवणी जागवल्या.
आ. बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी भोसा खिंड व कुकडीचे पाणी केवळ मुंडे यांच्यामुळेच नगर जिल्ह्य़ाला मिळाले याची माहिती दिली. मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही त्यांची नव्हेतर गोरगरिबांचीच विकासाच्या दृष्टिकोनातून मागणी होती, याकडे आमदार शिवाजी कर्डिले यांनी लक्ष वेधले.
आ. राम शिंदे, आ. अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, कॉ. सुभाष लांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, मनसेचे वसंत लोढा व अॅड. अनिता दिघे, संपत म्हस्के, उबेद शेख, माजी आमदार पांडुरंग अभंग, हेरंब औटी, डॉ. अजित फुंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, हभप बाळकृष्ण भोंदे, माजी आमदार संभाजीराव फाटके, अण्णासाहेब शेलार, कवी लहू कानडे, शिवाजी शेलार, हरजितसिंग वधवा, भगवान फुलसौंदर, अंबादास गारुडकर, गुलशन जग्गी, कुंडलिक जगताप, अभय आगरकर आदींनी आदरांजली अर्पण केली.
घडवून आणलेला अपघात- विखे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी मुंडे यांच्या मृत्यूचा उल्लेख ‘घडवून आणलेला अपघात’ असा केला. हा अपघात समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा होता, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांत कुजबुज सुरू झाली होती. श्रोत्यांनी मात्र त्यांच्या या वक्तव्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. प्रस्थापितांविरुद्ध लढणा-या मुंडे यांना अनेक कलंक लावण्याचे प्रयत्न झाले. अगदी जातीयवादाचा आरोपही त्यांच्यावर झाला, मात्र जनतेच्या प्रेमामुळे व भगवानबाबांच्या श्रद्धेमुळे ते लोकनेते झाले, असे विखे म्हणाले.
नेत्यांच्या भावना
माजी आमदार कदम यांना मुंडे यांच्या आठवणीने भावना अनावर झाल्या. ज्येष्ठ नेते गडाख यांनी विधान परिषदेसाठी आपल्याला मुंडे यांनी कशी मदत केली व नगरनंतर लगेचच बीड येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला आपण त्यांना कशी मदत केली, याची आठवण सांगितली. आ. पाचपुते यांनी मुंडे वारकरी होते व त्यांनी सात वेळा पंढरपूरला पायी वारी केल्याची माहिती दिली. आरपीआयचे अशोक गायकवाड यांनी मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2014 रोजी प्रकाशित
गोपीनाथ मुंडे यांचे जिल्ह्य़ात स्मारक उभारणार- खा. गांधी
दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे वर्षभरात नगर जिल्ह्य़ात स्मारक उभारण्याची व त्यांच्या आठवणींची स्मरणिका प्रकाशित करण्याची घोषणा खासदार दिलीप गांधी यांनी नगरमध्ये आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत केली.
First published on: 16-06-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorial will raise of gopinath munde in district mp gandhi