नगर शहर मतदारसंघातील मतदान यंदा मागच्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहे. मुळातच चार राजकीय पक्षांच्या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली असताना या वाढीव दहा टक्क्यांमुळे निकालाचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. त्यामुळेच अनेकांना विजयी उमेदवाराच्या मताधिक्याबाबत शहरातील सन १९७८ आणि सन १९८० अशा दोन निवडणुकांच्या निकालाची आठवण होऊ लागली आहे.
नगर शहरात यंदा ५९.८८ टक्के मतदान झाले आहे. मागच्या तुलनेत ही वाढ १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. २ लाख ७४ हजार ८९२ पैकी १ लाख ६४ हजार ६१२ जणांनी मतदान केले. गेल्या वेळी शहराचे मतदान २ लाख ५४ हजार होते. त्या वेळी जेमतेम ४९ टक्के मतदान झाले होते. यंदा २० हजार मतदार वाढले आणि मतदान १० टक्क्यांनी वाढले. या वाढीचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला, याबाबत शहरात मतांतरे आहेत. यावर चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, आमदार अनिल राठोड (शिवसेना), अभय आगरकर (भाजप), सत्यजित तांबे (काँग्रेस) आणि संग्राम जगताप (राष्ट्रवादी) हे चारही उमेदवार या लढतीत तुल्यबळ असल्याचे सांगण्यात येते. या चौघांचेही समर्थक आपापल्या उमेदवाराच्या विजयाचे दावे करत असले तरी चौरंगी लढतीमुळे निश्चित अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळेच कोणीही निवडून आले तरी मताधिक्य अत्यंत कमी असेल आणि चारही उमेदवारांमध्ये फारसा फरक नसेल, असा एक सार्वत्रिक सूर दिसतो. या एकवाक्यतेने अनेकांना विधानसभेच्या सन १९७८ आणि सन १९८० या दोन निवडणुकांची आठवण होऊ लागली आहे. ती होण्याचे कारण म्हणजे, त्या वेळी विजयी उमेदवारांना मिळालेले निसटते मताधिक्य.
आणीबाणीमुळे सन १९७८च्या निवडणुकीत देशात काँग्रेसविरोधी लाट होती. या लाटेत झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी बाजी मारली, मात्र त्यांना अवघे ३४८ मतांची आघाडी मिळाली होती. त्यांना १९ हजार ३९ मते आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे यांना १८ हजार ६९१ मते मिळाली होती. त्यानंतर सन १९८०ला झालेल्या निवडणुकीतही कमालीची चुरस होती. इंदिरा काँग्रेसचे उमेदवार प्रा. एस. एम. आय. असीर त्या वेळी अवघ्या २ हजार ३२२ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधातही डॉ. पाऊलबुद्धेच होते. असीर यांना ३० हजार १२२ आणि पाऊलबुद्धे यांना २७ हजार ८०० मते मिळाली होती. सन ५२ पासूनच्या मागच्या १३ निवडणुकांमध्ये या दोनच निवडणुकांमध्ये अशी चुरस पाहायला मिळते. अनेकांना तशीच स्थिती या निवडणुकीत वाटते, कोणीही निवडून आले तरी मताधिक्य कमालीचे घटेल असा अंदाज व्यक्त होतो.