विजय राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात पालघर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले कामगार आता आपल्या घरी परतू लागले आहेत. घरी परतण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना घरापर्यंत पायी प्रवास करावा लागत आहे. यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबेर घरी पोहोचल्यानंतर त्यांना अन्न-धान्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली खरी! पण यामुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लगतच्या गुजरात राज्यातील भिलाड व परिसरातून कामानिमित्त अनेक आदिवासी बांधव हे पालघर जिल्ह्यातील वीटभट्टी, बांधकाम व इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधानांनी देशातील नागरी आणि ग्रामीण सर्वच भागात लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर सर्व कामांना ब्रेक लागल्याने या मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने ७० ते ८० नागरिक या ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये लहान मुले व स्त्रियांचा समावेश असून आता घरी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. त्यापैकी काहींनी भिलाड ते चारोटी हे ४० ते ४५ किलोमीटरचं अंतर पायी चालत जाण्याचा पर्याय निवडला आहे.

उपाशीपोटी प्रवास सुरु

लॉकडाऊन केल्यानंतर सद्यस्थितीला फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स बंद असल्याने वाटेत उपाशीपोटी त्यांना प्रवास करणे भाग पडले आहे. पोटामध्ये अन्न नाही, प्यायला पाणी नाही, डोक्यावर ऊन, पायात चप्पल नाही अशा परिस्थितीत घर गाठायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migrant workers in palghar due to lockdown travel back to home due to lockdown in country aau
First published on: 25-03-2020 at 15:33 IST