मंदार लोहोकरे

शेती आणि पशुपालन उतरणीला ; रोजगारासाठी बहुसंख्य लोकांचे स्थलांतर

भीषण दुष्काळामुळे राज्यात अनेक ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतर सुरू असताना माळशिरस तालुक्यातील जळभावी या गावात तर या दुष्काळामुळे गेली चार वर्षे बहुतांश घरे कुलूपबंद झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शेती आणि शेळ्या-मेंढय़ांचे पालन ही गावकऱ्यांची रोजगाराची पारंपरिक साधने. पण गेल्या चार वर्षांत त्यांनाही उतरण लागली आहे. बहुसंख्य लोकांनी रोजगाराच्या शोधात गावच्या घराला कुलूप ठोकले असून शहरांकडे धाव घेतली आहे. या स्थलांतराचा फटका लोकसभा निवडणुकीलाही बसला असून केवळ ४० टक्के मतदारांनीच मतदान केले आहे.

सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस तालुक्यातील जळभावी हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. जेमतेम ३०० उंबरठय़ाची ही वस्ती. १९६२ साली येथील ग्रामपंचायत स्थापन झाली. मात्र गेल्या सलग चार वर्षांपासून पावसाचे घटलेले प्रमाण, खोल गेलेली भूजल पातळी आणि दुष्काळामुळे वस्त्या ओस पडू लागल्या आहेत.

नोकरी-व्यवसायासाठी सुरुवातीला जे एक दोघे गाव सोडून शहराकडे गेले त्यांची मदत आणि दिशा पकडत अनेकांनी शहराची वाट पकडली आहे. आज जळभावीतील जवळपास निम्मे लोक सहकुटुंब शहराकडे गेले आहेत. अनेकांनी पुणे, मुंबई, ठाणे शहरात बांधकाम व्यवसायावर मजुरी करणे पसंत केले आहे. काही ऊसतोड मजूर झाले आहेत. काही जण परंपरागत मेंढपाळ व्यवसाय जपत राज्यभर फिरून पोट भरू लागले आहेत. माळशिरसपासून १४ किलोमीटरवर हे गाव आहे. गावा जवळूनच महामार्ग गेला आहे. तसेच या गावात मुख्यमंत्री रस्तायोजना राबवली जात आहे. मोबाइलचे टॉवर देखील आले आहेत. मात्र दुसरीकडे दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे गावाची मात्र रया जात आहे.

गावातली शेती कोरडी पडली आहे. रोजगार संपुष्टात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई दिवसागणिक तीव्र होत आहे. त्यामुळे ज्यांनी गाव सोडलेला नाही, त्यांना जगणे अवघड झाले आहे. यामुळे गावात सध्या बहुतांश घरांना कुलूप लावलेले दिसते. जी घरे उघडी आहेत त्यामध्येही केवळ वृद्ध, महिला आणि लहान मुले दिवस काढत आहेत. घरातील पुरूष मंडळी रोजगाराच्या शोधात गावाबाहेर पडलेली आहेत. काहींनी आपले कुटुंबीय देखील बरोबर नेलेले आहेत. जळभावी गावाच्या नावात अग्रभागी असलेले पाणी प्रत्यक्षात मात्र आटत असल्याने गावकऱ्यांचा जीव तुटत आहे.

महिन्यातून एकदाच टँकर

माझं लगीन झालं तवा पाणीच पाणी होतं. पण गेल्या चार वर्षांपासून पाऊ स गायब झाला आहे. आता बघा, वीस दिस झाले टँकर आला होता. आता पुढं १५ दिसांनीच येणार. टँकरने आलेले आणि एकदा भरलेले पाणी महिनाभरासाठी जपून ठेवावे लागत आहे. माय बाप सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवावा म्हणजे पुरुष मंडळी गावात येतील, अशी विनंती पार्वती कुंभार या ८० वर्षांच्या वृद्धेने हात जोडून केली.

पाण्याचा प्रश्न सोडविणार 

मुळात जळभावी या गावात अत्यल्प पावसाची नोंद आहे. या गावात जलयुक्त शिवार, नाला बंदिस्ती, विहीर पुनर्भरण कामे केली आहेत. सध्या २ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. शिवाय लवकरच या गावाला पाणी पुरवठा करणारी योजना पूर्णत्वाला येत आहे.

– क्षमा पवार, प्रांताधिकारी, माळशिरस