हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीती; ३.६ रिश्टर स्केलची नोंद  | mild earthquake of 3 6 on richter scale in hingoli zws 70

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तीन तालुक्यांतील काही गावांमध्ये शनिवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी, त्यानंतर सात वाजून १२ मिनिटांदरम्यान असे दोन वेळा भूगर्भातून आवाज येत जमीन सौम्य प्रमाणात हादरली. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेसंबंधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.६ रिश्टर स्केलची नोंद झाली असून जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामस्थांसह यंत्रणेस सतर्क राहावे, असा इशारा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

वसमत तालुक्यातील कुरुंदा, पांगरा शिंदे, कोठारी, सिरली, कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरीसह काही गावांत शनिवारी, सकाळी भूगर्भातून आवाज आला. सोबतच जमीनही सौम्य प्रमाणात हादरली. यापूर्वीसुद्धा अनेक वेळा असा प्रकार घडला. परंतु यावर राज्य शासनाकडून कोणत्याच प्रकारची उपाययोजना अमलात आणली जात नाही किंवा या सौम्य भूकंपाचे केंद्र कुठे आहे, या बाबतीतही प्रशासन अद्यापतरी अनभिज्ञ आहे. भूकंपाबाबत  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, ग्रामीण भागात ज्यांच्या घरावरील पत्र्यावर दगड अथवा वजनदार वस्तू आहेत त्या तत्काळ काढून घ्याव्यात, जेणेकरून भविष्यात दुर्घटना टाळता येईल. लातूर भागात झालेल्या भूकंपाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.