दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्याप्रमाणे आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्सवर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये मिलिंद देवरा म्हणाले, “आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे. इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.”

हे वाचा >> मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप-शिंदे गटात संघर्ष?

माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत हे २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवार मिळणार नाही, हे स्पष्ट होते. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा होती. आता मिलिंद देवरा पुढील निर्णय कोणता घेतात? हे पाहावे लागेल.

आणखी वाचा >> ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद देवरा २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचं वजन आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटाचा दिल्लीत कोणीही प्रसिद्ध चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटही देवरा यांना प्रवेश देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तशी शक्यताही बोलून दाखविली होती.