गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना माहिती दिली आहे.

भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असा नारा काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासोबतच शरद पवार यांनी देखील दिला होता. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे.

“आता राष्ट्रवादीनं सिद्ध करून दाखवावं की…”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसलाच एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी आव्हान दिलं आहे. “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“शरद पवार साहेब, भाजपाची काळजी करू नका, तुम्ही पावसात भिजूनही…”, निवडणुकांवरून भाजपाचं खोचक प्रत्युत्तर!

काँग्रेसलाही दिलं युती करण्याचं आव्हान

दरम्यान, यावेळी बोलताना जलील यांनी काँग्रेसला देखील युती करण्याचं आव्हान दिलं आहे. “आम्ही कुणालाही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु”, असं जलील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाला पराभूत करण्यासाठी काहीही…

“सर्वात जास्त कुणी देशाचं नुकसान करत असेल, तर ती भाजपा आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही लागतं, ते आम्ही करायला तयार आहोत. उत्तर प्रदेशातही सपा, बसपासोबत आम्ही बोलणी केली होती. पण त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत, पण एमआयएम पक्ष नको. म्हणून मी ही ऑफर दिली आहे”, अशा शब्दांत जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे.