सावंतवाडी, सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावाजवळ असलेल्या सुमारे ५५ एकर सरकारी वनजमिनीला बेकायदेशीर खाण व्यवसायाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासनाच्या कथित आशीर्वादाने या परिसरात २० हून अधिक खाणी आणि क्रशर वर्षभर सुरू असून, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यासाठी सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी तक्रार केली आहे. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित खाणींवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.
सरकारी वनजमिनीवर खाण व्यावसायाचे अतिक्रमण:
निगुडे येथील सर्व्हे नंबर १२ मध्ये एकूण २०.३२.०० हेक्टर (सुमारे ५५ एकर) जमीन सरकारी वन म्हणून सात-बारा उताऱ्यावर नोंद आहे. या वनजमिनीच्या अगदी जवळच मोठ्या प्रमाणात काळ्या दगडांच्या खाणी आणि क्रशर सुरू आहेत. नियमांनुसार, वनजमिनीच्या हद्दीपासून १ किलोमीटरपर्यंतचा परिसर संवेदनशील (sensitive) मानला जातो आणि तिथे खाणकाम करण्यास परवानगी नसते. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, काही ठिकाणी खाणी थेट वनजमिनीच्या हद्दीपर्यंत पोहोचल्या आहेत, असे सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियमबाह्य कामकाज:
हा खाण व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. महसूल प्रशासन खाणकामासाठी किती ब्रासची परवानगी देते आणि प्रत्यक्षात किती उत्खनन होते, याचा लेखाजोखा मांडत नसल्याने गैरव्यवहाराला वाव मिळत आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. खाणकाम करणारे व्यावसायिक उत्खनन केलेल्या काळ्या दगडांचा पुरवठा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात करत आहेत. हा नफा कमावून देणारा व्यवसाय असल्याने प्रशासनाचा आशीर्वाद असल्याचा आरोप स्थानिकांसह सीए कल्याणकर यांनी केला आहे.
या प्रकरणी, सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी “माहिती घेऊन तपासणी करतो,” असे आश्वासन दिले आहे. तर, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी “वनजमीन आणि खाणींमध्ये २०० मीटरचे अंतर आहे,” असे सांगितले.
मात्र, पर्यावरणप्रेमी साईप्रसाद मंगेश कल्याणकर यांनी हे दावे खोडून काढले असून, खाणींमुळे वनजमिनीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असा पुनरुच्चार केला आहे. या खाणकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच, खाणींच्या आवाजामुळे शांततेलाही बाधा पोहोचत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पर्यावरणप्रेमींनी हरित लवाद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, तोपर्यंत पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांची फरफट थांबणार नाही, अशी भीती सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी व्यक्त केली.