नांदेड : ‘लेंडी धरण – अनेकांना मरण’ अशा दारुण स्थितीचा अनुभव घेणाऱ्या हसनाळ (ता. मुखेड) येथील आबालवृद्धांचा प्रशासनावरील तीव्र संताप व्यक्त करत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. मंगळवारी दिवसभर या प्रश्नावरुन निर्माण झालेली कोंडी सोडविण्यासाठी आलेले पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांना शासनाची तातडीची मदत देऊ केली. तसेच पुनर्वसनाचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितले.
हा प्रश्न सुटावा म्हणून सायंकाळी मुंबईहून महाजन यांना नांदेडला जाण्यास सांगण्यात आले. दरम्यान, हसनाळमध्ये पाणी का वाढले, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्पूर्वी जाहीर केले. लेंडी नदीच्या पुराने संपूर्ण हसनाळ गावाला रविवारच्या मध्यरात्रीनंतर आपल्या कवेत घेतल्यामुळे तेथील महिला-पुरुष, लहान मुले आणि तरुणांना जीवघेण्या संकटाला तोंड द्यावे लागले. या आपत्तीत गावातल्या पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथील समस्त ग्रामस्थांची खदखद, त्यांच्या दुःखद वेदना आणि संताप मंगळवारी समोर आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना येथे अनेक तास तळ ठोकावा लागला. शासनाच्या इतर यंत्रणाही तेथे मदत व बचाव कार्यात कार्यरत होत्या. स्थानिक आमदारांचे हसनाळ परिसरात आगमन झाल्यानंतर त्यांच्यावरही लोकांना संताप व्यक्त केला.
पुराच्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत सापडले होते. तर मंगळवारी शोध मोहिमेतून उर्वरित दोघांचे मृतदेह हाती लागले. या दुर्घटनेनंतर एकवटलेल्या ग्रामस्थांनी आपल्या वेगवेगळ्या मुद्यांवर समाधान झाल्याशिवाय मृतकांचा अंत्यविधी होणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्यामुळे सायंकाळपर्यंत तेथील परिस्थिती अतिशय गंभीर व चिंताजनक होती.
मुखेड व हसनाळ परिसरातील एकंदर स्थितीची माहिती दुपारी शासनापर्यंत पोहचल्यानंतर जिल्ह्याला नवखे असलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना पाठविण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने गिरीश महाजन यांना विमानाने नांदेडला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाजन यांचे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथे आगमन झाले. विमानतळावरून ते थेट मुखेडकडे रवाना झाले. या प्रवासादरम्यान त्यांनी एकंदर परिस्थिती जाणून घेतली. लोकांची भावना आपल्याला लक्षात आली आहे, त्यांच्याशी संवाद साधून तेथील परिस्थिती सुरळीत व पूर्ववत केली जाईल, असे महाजन यांनी प्रवासादरम्यान ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हसनाळ येथील दुर्घटनेत मृत पावलेल्यांचे मृतदेह मुखेडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मृतांचे नातेवाईक आणि हसनाळच्या प्रमुख ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या मागण्यांची नोंद घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सर्वांना आश्वासन दिले होते.
मुखेड तालुक्याच्या काही गावांमध्ये आपत्ती निवारणात महसूल व इतर वेगवेगळ्या यंत्रणा सोमवारपासूनच कार्यरत झाल्या. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून छत्रपती संभाजीनगर येथून लष्कराची ६५ जणांची एक तुकडी हसनाळ व इतर गावांमध्ये पोहोचली. हसनाळमधील मदत कार्याला मंगळवारी गती आली. बाधितांच्या भोजनाची तसेच आवश्यक त्यांना वैद्यकीय उपचारांची व्यवस्थाही लष्करी पथकाकडून सुरू झाली. एकंदर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.