‘आमचे फाटेल अन् त्यांचे कसे जमेल’ यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून असल्याचा टोला लगावताना, विरोधी नेते अजित पवारांच्या अनुपस्थितीचा आपाआपल्या परीने अर्थ काढत असून, त्यात काहीही तथ्य नसल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मंत्री महाजन कराड विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंची साथ असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळ बैठक व कार्यक्रमांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींनी ‘अजितदादा नाराज’ या अंगाने राज्य सरकारवर केलेल्या टीका, टिपणीसंदर्भात छेडले असता गिरीश महाजन म्हणाले, आमच्या विरोधातील प्रत्येकजण आपाआपल्या परीने याचा अर्थ काढून सोयीची व्यक्तव्य करीत आहेत. त्यांच्या या बोलण्यात काहीही तथ्य नाही. अजितदादांची तब्बेत बरी नसल्यामुळे देवगिरी बंगल्यावरील कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. याबाबत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेत. त्यामुळे ‘आमचे फाटेल अन् त्यांचे कसे जमेल’ यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून असल्याचा टोला मंत्री महाजन यांनी विरोधी टीकाकारांना लगावला.
हेही वाचा >>> “बावनकुळेंना सांगतो, अजून १० खासदार पाठवले तरी…”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा
सध्या सरकार निवडणुकांसाठी तयार नसल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते लांबणीवर टाकत असल्याचा आरोप फेटाळून लावत सरकार कोणत्याही निवडणुका घेण्यासाठी घाबरत नसल्याचे ठामपणे सांगताना, निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर करायच्या हा निर्णय निवडणूक आयोगाचा असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
दैनिक सामनातून ‘सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर’ अशा झालेल्या टीकेवर सध्या सामनाच व्हेंटिलेटरवर असल्याचा टोला महाजन यांनी लगावला. नांदेडची घटना चितेंची बाब आहे. आपण स्वतः व पालकमंत्र्यांनी तिथे भेट दिली. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हेही त्याठिकाणी जाऊन आले. वाढत्या मृत्यूबाबत शासन गंभीर असून, टीका करणारे टीका करत राहतील, त्यांच्याकडून आम्हाला वेगळी आशा नसल्याचे महाजन म्हणाले.