शिवसेना आणि शिंदेगटातील वाद चांगलाच वाढला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. “३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवा विषय मिळाला आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेश दर्शनाचा सपाटा; अजित पवार कॅमेराचा उल्लेख करत म्हणाले, “भाईंना शो करायची…”

आदित्य ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही. जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतोय. मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘ज्याप्रमाणे अली बाबा चाळीस चोर होते, तसं आम्ही शिंदे बाबाके चाळीस’

“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील म्हणालेत.

हेही वाचा- “अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता…,” ‘सामना’तून भाजपावर जोरदार टीका, म्हणाले “मेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही”

संजय राऊतांवर टीका

“शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उडाले ते कावळे राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. राऊत यांना आवरा असं म्हणत चहा पेक्षा किटली गरम अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. ते म्हणाले, 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते. कोण संजय राऊत? आमदाराने मत दिली म्हणून ते खासदार झाले”. असं म्हणत पाटील यांनी राऊतांवरही टीका केली.