राज्यामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सत्तांतरणानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक नेत्यांच्या घरी भेटीगाठी देत आहेत. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उद्योगपती मुकेश अंबांनीपासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत अनेकांच्या घरी शिंदे मागील काही दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी जाऊन आले आहेत. मात्र याच गणपती दर्शनाच्या मुद्द्यावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना शाब्दिक चिमटे काढले आहेत.

नक्की पाहा >> CM शिंदेंच्या निवासस्थानी फडणवीसांना मिळाला आरतीचा मान तर PM मोदींनी ‘या’ नेत्याच्या घरी केली गणपतीची आरती; पाहा Photos

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीय वर्तुळामध्ये ज्या ‘भाई’ या नावाने ओळखलं जातं तोच उल्लेख करत अजित पवारांनी टोला लगावला आहे. “आधीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाही. आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना आता मात्र चित्र बदलल्याचा संदर्भ अजित पवार यांनी दिला आहे. “पण आता कशी गाडी एन्ट्री करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, मग कोणतरी उतरतं. मग नमस्कार करतात. कशाला हे?” असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”

“जो गणेशभक्त आहे. त्याने अशापद्धतीने देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना,” असा सल्ला अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला. “भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे. आता त्याला काय करायचं? जनतेनेच बघावं आता काय चाललंय आणि काय नाही,” असंही विरोधी पक्षनेते असणाऱ्या अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मागील काही दिवसांमध्ये शिंदे गणपती दर्शनासाठी कोणाकोणाच्या घरी जाऊन आले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर गणेश दर्शन सुरू होते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे , माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही निवास्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात साहजिकच प्रतिक्रिया उमटली.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी रिलायन्स उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शीवतीर्थ’ निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली. यावेळी शिंदे गटातील स्थानिक आमदार सदा सरवणकर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्याकडे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली. या वेळी राजकीय चर्चा कोणताही झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गेल्या तीन – चार दिवसांत भाजपा नेत्यांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची कोंडी कशी करायची यावर खल झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी नंतर माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे व मनोहर जोशी यांची ही दुसरी भेट असून आगामी दसरा मेळाव्याच्या तोंडावर ती महत्त्वाची मानली जात आहे. भाजपा व शिंदे गटात समन्वयाची जबाबदारी असलेले आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील घरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पाली हिल येथील निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी गणेशाचे दर्शन घेतले आणि नार्वेकर यांच्याशी संवाद साधला.