कराड : विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवता न आल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वारंवार भाजप आणि देशातील लोकशाही संस्थांवर आरोप करत असल्याची टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सातारा जिल्ह्यातून विरोधी पक्ष संपण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला.
बोगस मतांबाबतची भूमिका निवडणुकीनंतर सात-आठ महिन्यांनी मांडणे हास्यास्पद आहे. लोकांनी दिलेला कौल स्वीकारून त्यांनी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही गोरे यांनी या वेळी चव्हाण यांना दिला.
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजने संदर्भातील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत पहिल्या वर्षी राज्यातील सात हजार ग्रामपंचायती सहभागी होतील. दरवर्षी २० टक्के ग्रामपंचायती या अभियानात सामील होणार असून, गावोगावी विकासाची स्पर्धा पाहायला मिळेल. गावे स्वयंस्फूर्तीने बदल घडवतील आणि बदललेल्या गावांचे स्वरूप महाराष्ट्राला दिसेल अशी ग्वाही ग्रामविकासमंत्र्यांनी दिली.
‘काँग्रेसच नव्हे, तर विरोधी पक्ष सातारा जिल्ह्यातून संपण्याच्या मार्गावर आहेत. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रवेश सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत आणि पुढील काळात आणखी भाजप प्रवेश होतील, असा विश्वास मंत्री गोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना व्यक्त केला.