“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ५ आणि आमदार १६ आहेत. अशी व्यक्ती दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाऊन देशाच्या पंतप्रधानांवर बोलते. पण त्यांची राजकीय उंची किती? एकदा मुख्यमंत्री झाले म्हणून एवढे बोलतात? त्यांची राजकीय उंची काय? पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची वैचारीक उंची नाही. आमच्या भाजपाचे ३०३ खासदार आहेत आणि ठाकरे गटाचे ५ खासदार आहेत. हे पानावर टाकण्याएवढी चटणीही नाही. मग फक्त मुख्यमंत्री झाले म्हणून तुम्ही एवढे बोलणार का? हे मोदींवर टीका करतात. म्हणतात की, पंतप्रधान मोदींचा पक्ष तडीपार करा. जर आमची केंद्रामध्ये आणि राज्यात सत्ता आहे, तर तडीपार करायचे ठरले तर आम्ही कुणाला तडीपार करू, कोरोनाच्या काळात ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना तडीपार करू ना?”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात? त्यांची मानसिक स्थिती बिघडली असे वाटतेय. देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याएवढी त्यांची पात्रता नाही. तरीही तडीपारची भाषा करतात. आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जरा माहिती घ्या. फक्त सामना वाचू नका. दुसरीही माहिती घेत जा. मी ४० वर्ष शिवसेनेत होतो. आम्ही ज्यावेळी मातोश्रीवर भेट द्यायचो. तेव्हा रिकाम्या हाताने कधीही जायचो नाही. तेव्हा ‘प्रसाद’ घेऊन जावे लागायचे. मग तुम्ही त्यावेळी आमच्याकडून जो पैसा मागत होता, तो पैसा काळा पैसा नव्हता का? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा व्यवसाय काय आहे?”, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

हेही वाचा : कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”

“मोदीजींनी करोना काळात ८० कोटी गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली. ती योजना आजही सुरू आहे. पण उद्धव ठाकरे यांनी करोना काळात कधी स्वत:च्या पैशाने कोणाला धान्य पाठविले का?”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत हे शरद पवार यांचा प्रमाणिक माणूस आहे. ज्यावेळी मी दिल्लीत शरद पवारांच्या ऑफिसकडून जात असे, तेव्हा संजय राऊत तेथे बसलेले असत. शिवसेना संपवायला फक्त संजय राऊत हे जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी आता तोंड बंद करावे”, असे राणे म्हणाले.