राहाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून, संरक्षण सिध्दता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. दहशतवादाच्या विरोधातील कठोर कारवाई महत्त्वपूर्ण असून, पहलगाम येथील हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने दिलेले चोख उत्तर कौतुकास्पद आहे. सैन्यदलाची कामगिरी देशवासीयांचा अभिमान वाढविणारी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
पहलगाम येथे २६ भारतीय पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय संयमाने दहशतवाद्यांच्या या कृत्याला चोख उत्तर देऊन आतंकवाद कधीही सहन करणार नाही, असा इशाराच या अभिमानास्पद कामगिरीतून दिला असल्याचे विखे यांनी सांगितले.
दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करून, भारतीय सैन्य दलाने आपली संरक्षण सिध्दता दाखवून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सैन्यदलाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन देशवासीयांच्या मनामध्ये असलेली भावना कृतीत उतरवल्याचे त्यांनी सांगितले.