दापोली – अवकाळी पावसामुळे झालेले सर्व नुकसान तात्काळ तपासून तीन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकेल. तसेच फळबागांचे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करून संबंधितांना शासनस्तरावरून योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतपिकांसह फळबागांचेही नुकसान झाले असून, काही ठिकाणी घरांची पडझड आणि रस्त्याचे देखील नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली.
घरांची पडझड आणि इतर आपत्ती निवारणासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना ही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री. यादव, आणि जिल्हा कृषी अधीक्षक श्री. सदाफुले उपस्थित होते.
