ADR Report on Ministers Assets: एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर दाखल असलेले गुन्हे आणि त्यांची संपत्ती किती आहे? याबाबतचा तपशीलवार अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला. देशातील एकूण ६४३ मंत्र्यांपैकी ३०२ मंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात दिली आहे. सर्व मंत्र्यांकडे एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे किती मालमत्ता आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे.
अहवालात काय समोर आले?
देशातील २७ राज्यांचे विधीमंडळ, तीन केंद्रशासित प्रदेश आणि केंद्राच्या ६४३ मंत्र्यांपैकी ३०२ म्हणजेच ४७ टक्के मंत्र्यांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे निवडणुकीच्या शपथपत्रात नमूद केले आहे. त्यातील १७४ मंत्र्यांवर खून, अपहरण आणि महिलांवरील अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ३० दिवस कारावास भोगणाऱ्या विद्यमान मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधेयक केंद्राने संसदेत सादर केल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २० ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आलेली हे विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात आले आहे.
मंत्र्यांकडे संपत्ती किती?
देशभरातील मंत्र्यांनी जाहिर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीनुसार सर्व मंत्र्यांची संपत्ती २३,९२९ कोटींवर पोहोचते. प्रत्येक मंत्र्यांकडे सरासरी ३७.२१ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारमधील ७२ मंत्र्यांपैकी ६ मंत्र्यांकडे १०० कोटींहून अधिकची मालमत्ता आहे.

१०० कोटींहून अधिक मालमत्ता असलेले महाराष्ट्रात किती मंत्री?
कर्नाटकमधील आठ मंत्र्यांनी त्यांची मालमत्ता १०० कोटींहून अधिक असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सहा आणि महाराष्ट्रात चार मंत्री असे आहेत.
मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत ८ व्या क्रमाकांवर आहेत. त्यांच्याकडे एकूण ४४७ कोटींची मालमत्ता आहे.
सर्वात श्रीमंत नेता कोण?
तेलगू देसम पक्षाचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सर्वाधिक ५,७०५ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. तर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी १,४१३ कोटी तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी ९३१ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे.