सांगली : विधानसभा निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्तीला सांगली जिल्ह्यात मिरज व सांगली या दोन जागांची मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. लोकसभेवेळी आमच्या पक्षाने कोणत्याही जागेची मागणी महायुतीकडे केली नव्हती. यामुळे विधानसभेसाठी आमचा जागेचा आग्रह महायुतीमधील भाजपकडे राहील असे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी भाजपचे अनुसूचित जाती जमाती सेलचे सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे उपस्थित होते.

कदम म्हणाले, राज्यात आमचा पक्ष महायुतीमधील घटक पक्ष असला तरी आम्ही भाजपच्या कोट्यातून विधानसभेच्या जागेसाठी आग्रही आहोत. जनसुराज्य शक्ती पक्षाने यापूर्वी मिरज व जत विधानसभा निवडणूक लढवली असून त्यावेळी लक्षणीय मतदान घेतले असून आता आमच्या पक्षाची ताकद या दोन मतदारसंघांमध्ये वाढली आहे. यामुळेच जिल्ह्यातील दोन जागांचा आग्रह आम्ही धरला आहे. याबाबत पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागेबाबत होणारी चर्चा अंतिम असेल, मात्र, महायुतीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार आम्ही करणार आहोत.

हेही वाचा – सांगली : आठ दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या रस्त्यासाठी २ कोटी मंजूर

मिरज मतदारसंघ हा पालकमंत्री सुरेश खाडे यांचा पारंपारिक मतदारसंघ असताना आपली मागणी कशी मान्य होऊ शकते असे विचारले असता ते म्हणाले, पक्ष विस्ताराचा प्रत्येक पक्षाचा नैसर्गिक अधिकार असून गेल्या दोन-अडीच वर्षात पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामाच्या जोरावर आम्ही विधानसभेच्या जागेसाठी आग्रही आहोत. भाजपने पुन्हा मंत्री खाडे यांना उमेदवारी दिली तर निश्‍चितच महायुतीचा मैत्रीधर्म म्हणून आम्ही या उमेदवाराच्या पाठीशी राहू असा निर्वाळाही कदम यांनी दिला.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारची दोन वर्षे, मुख्यमंत्र्यांची खास पोस्ट; म्हणाले, “महायुतीमधील पक्षांचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांना मिरज मतदारसंघातून विजयी उमेदवारापेक्षा २५ हजार मतदान कमी झाले. यामागे केवळ उमेदवाराबाबत असलेली नाराजी हे एकमेव कारण नसून आमच्यात झालेल्या काही चुकाही कारणीभूत आहेत. या चुकांची दुरुस्ती करून विधानसभेला महायुती सामोरी जात आहे. भाजपचा झालेला पराभव ही सामुहिक जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले. विधानसभेसाठी महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असेही कदम व प्रा. वनखंडे यांनी सांगितले.